सलग तीन व्यवहारांतील तेजीमुळे अभूतपूर्व शिखर टप्प्याला असलेल्या भांडवली बाजारात नफेखोरी साधण्याचा मोह गुंतवणूकदारांना बुधवारी टाळता आला नाही. परिणामी सेन्सेक्स तसेच निफ्टी हे प्रमुख निर्देशांक गडगडण्यासह, गुंतवणूकदारांच्या संपत्तीचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास दिसून आला.

बुधवारच्या व्यवहाराची सुरुवात आधीच्या तीन दिवसांप्रमाणे सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी नवीन अत्युच्च शिखर गाठून केली. मात्र पुढे नफावसुलीने सुरू झालेल्या विक्रीतून सेन्सेक्स तब्बल ६९४.९२ अंश घसरणीने ४३,८२८.१० पर्यंत खाली आला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९६.७५ अंश आपटीने १२,८५८.४० वर स्थिरावला. सत्राच्या प्रारंभाला सेन्सेक्सने ४४,८२५.३७ तर निफ्टीने १३,१४५.८५ असे यापूर्वी कधीही न दिसलेले विक्रमी स्तर दाखविले. तथापि हा प्रारंभिक उत्साह अल्पजीवी ठरला.

वरच्या स्तरातील निर्देशांकांनंतर गुंतवणूकदारांच्या बँक तसेच वित्त क्षेत्रातील समभागांच्या जोरदार विक्री धोरणामुळे दिवसअखेर दोन्ही प्रमुख निर्देशांक मंगळवारच्या तुलनेत दीड टक्क्यापर्यंत खाली आले

व्यवहाराची सुरुवात तेजीने तर सत्रअखेर मोठय़ा घसरणीत रूपांतरित झाल्याचे बुधवारी दिसून आले. मुख्यत: दुपारनंतर मात्र बाजारात विक्रीचा दबाव वाढला. अखेरच्या तास-दीड तासाच्या व्यवहारात  निर्देशांक मोठय़ा फरकाने खाली आले. बँक, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची गुंतवणूकदारांनी विक्री केली.

सेन्सेक्समध्ये कोटक महिंद्र बँक सर्वाधिक, ३.२२ टक्क्यांसह घसरला. तसेच अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, इन्फोसिस, टेक महिंद्रही घसरले. मुंबई निर्देशांकातील ३० पैकी केवळ ओएनजीसी, पॉवरग्रिड व इंडसइंड बँक ६.२५ टक्क्यांपर्यंत वाढले.

२.२४ लाख कोटींचा चुराडा

बुधवारच्या व्यवहारात ‘सेन्सेक्स’चा सत्रातील उच्चांक ते  तळ यात १,००० अंशांचा फरक राहिला. या इतक्या मोठय़ा हिंदोळ्यात मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्तीला तब्बल २.२४ लाख कोटी रुपयांचा फटका सोसावा लागला. भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल व्यवहारअखेर १७२.५६ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले. बँक, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागामध्ये विक्रीमुळे  जबर मूल्यऱ्हास झाली.

काव्‍‌र्हीवर ‘बीएसई’चीही हद्दपारीची कारवाई 

नियामक तरतुदींच्या पालनात कसूर केल्याबद्दल राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) पाठोपाठ मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगचे दलाल पेढी म्हणून सदस्यत्व रद्दबातल केले आहे. मुखत्यार पत्रांचा (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) गैरवापर करून गुंतवणूकदार ग्राहकांच्या डीमॅट खात्यांतील रोख्यांना स्वत:च्या डीमॅट खात्यावर घेऊन २,००० कोटींपेक्षा अधिक मूल्याच्या उलाढाली केल्याचा काव्‍‌र्हीवर ठपका आहे.

रुपयाचे मूल्य मात्र मासिक उच्चांकी

सलग चौथ्या सत्रात भक्कम होताना रुपया बुधवारअखेर त्याच्या महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य १० पैशांनी वाढून ७३.९१ वर पोहोचले.