वाढत्या करोना साथीने कडक टाळेबंदी लागण्याच्या धास्तीने गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभीच प्रमुख निर्देशांकांना मोठी घसरण नोंदवण्यास भाग पाडले. सेन्सेक्ससह निफ्टी एकाच व्यवहारात जवळपास दोन टक्क्यांनी खाली आले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी ८८२.६१ अंश घसरणीने ४७,९४९.४२ पर्यंत आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५८.४० अंश आपटीने १४,३५९.४५ वर स्थिरावला.

नव्या आठवड्याच्या प्रारंभापासूनच मोठी घसरण नोंदवणारा मुंबई निर्देशांक सकाळच्या सत्रातच शुक्रवारच्या तुलनेत जवळपास १,५०० अंशांनी खाली आला होता. यावेळी त्याने केवळ ४९ हजाराचाच नव्हे तर ४७,५०० चा स्तरही सोडला होता.

देशातील करोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी २ लाखांची भर पडल्याने टाळेबंदीचे नियम अधिक कडक केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये याबाबतची चाचपणी सुरू आहे.

परिणामी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा जोर सप्ताहारंभीच्या पहिल्याच व्यवहारात वाढवला. असे करताना त्यांनी पॉवर ग्रिड, ओएनजीसी, इंडसइंड बँक, कोटक महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, महिंद्र अँड महिंद्र आदीची विक्री केली. मुंबई निर्देशांकांतील प्रमुख ३० पैकी केवळ डॉ. रेड्डीज् व इन्फोसिसचे समभाग मूल्य वाढू शकले. त्याचे प्रमाण प्रत्येकी दीड टक्क्यापर्यंत होते. औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले.

बँक, वित्त, वाहन क्षेत्रीय निर्देशांकातील आपटी तर ११ टक्क्यांपर्यंतची राहिली. तर स्थावर, मालमत्ता, भांडवली वस्तू, ऊर्जा निर्देशांक ४ टक्क्यांपर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक जवळपास दोन टक्क्यांनी आपटले.

गेल्या सप्ताहात सेन्सेक्समध्ये ७५९.२९ अंश तर निफ्टीत २१७ अंश भर पडली होती. टक्केवारीत हे प्रमाण प्रत्येकी दीड टक्क्याचे होते. नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ही सारी तेजी निमाली.

गुंतवणूकदारांना ३.५३ लाख कोटींचा फटका

सप्ताहारंभीच्या जवळपास दोन टक्के सेन्सेक्स आपटीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सोमवारी पहिल्याच दिवशी ३.५३ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्याचे एकूण बाजार भांडवल २०१.७७ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.

रुपयातही घसरण

भांडवली बाजाराप्रमाणे परकीय चलन विनिमय मंचावरही गुंतवणूकदारांची चिंता दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सोमवारी थेट ५२ पैशांनी कमी होत ७४.८७ पर्यंत खाली येऊन ठेपले. भांडवली बाजारातील निधी ओघ कमी करण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांना लागणाऱ्या अमेरिकी चलनावर दबाव निर्माण झाल्याचा विपरीत परिणाम रुपयावर झाला.