गेल्या तीन व्यवहारातील भांडवली बाजारातील तेजीला अखेर गुरुवारी खीळ बसली. महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या सत्रात सेन्सेक्स २२.८२ अंश घसरणीसह २४,४६९.५७ वर तर निफ्टी १३.१० अंश घसरणीसह ७,४२४.६५ वर थांबला.
गेल्या सलग तीन व्यवहारातील वाढीमुळे सेन्सेक्समध्ये ५३०.१८ अंशांची भर पडली होती. शुक्रवारच्या अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या स्थिर पतधोरण बैठकीवर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी बाजारात व्यवहार केले.
मुंबई शेअर बाजारातील अभियांत्रिकी, बँक, वाहन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांचे मूल्य घसरले. सेन्सेक्समध्ये लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, अ‍ॅक्सिस बँक, भेल, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी लिमिटेड हे घसरणीच्या यादीत राहिले. तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल यांचेही समभाग घसरले. मुख्य निर्देशांकातील घसरण थोडय़ा प्रमाणात नोंदविण्यास हीरो मोटोकॉर्प, टाटा स्टील, विप्रो, टाटा स्टील, सिप्ला, इन्फोसिस, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक यांच्या समभागांतील ३ टक्क्य़ांपर्यंतची वाढ कारणीभूत ठरली. सेन्सेक्समधील १४ समभाग वाढले होते.