News Flash

सेन्सेक्स, निफ्टीत पुन्हा घसरण

निर्देशांकांची सुमार सप्ताह कामगिरी

(संग्रहित छायाचित्र)

देशातील करोनाबाधितांच्या संख्येने दिवसात तीन लाखांचा टप्पा ओलांडण्याची भीती सप्ताहअखेरच्या व्यवहारात भांडवली बाजारात उमटली. वाढत्या आरोग्य जोखमेचा अर्थव्यवस्थेवरील संभाव्य विपरीत परिणामांची धास्तीही गुंतवणूकदारांमध्ये सप्ताहअखेरचे व्यवहार करताना उमटली.

आठवड्यातील शेवटच्या दोलायमान व्यवहाराची अखेर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधील २०२.२२ अंश घसरणीने झाली. परिणामी मुंबई निर्देशांक सत्रअखेर त्याचा गुरुवारचा ४८ हजारांचा स्तर सोडत ४७,८७८.४५ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६४.८० अंश घसरण होऊन प्रमुख निर्देशांक १४.३४१.३५ पर्यंत खाली आला.

डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या लक्षणीय टप्प्यानजीकच्या उताराचे पडसादही भांडवली बाजारात उमटले.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर ०.०६ टक्क्यांनी घसरून ६५.३६ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. सप्ताह कामगिरीबाबत सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे ९५३.५८ अंश तर निफ्टी २७६.५० अंश नुकसान नोंदवणारे ठरले. दोन्ही प्रमुख निर्देशांकात प्रत्येकी जवळपास दोन टक्यांची आपटी या दरम्यान अनुभवली गेली.

सेन्सेक्समधील २.६३ टक्क्यांनी घसरण झालेल्या महिंद्र अँड महिंद्रला सर्वाधिक फटका बसला. तसेच डॉ. रेड्डीज, टेक महिंद्रा, हिंदुस्थान यूनिलिव्हर, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, टायटन आणि इन्फोसिस यांचेही मूल्य रोडावले. तर पॉवरग्रीड, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी आणि बजाज फिनसव्र्ह हे ३.५ टक्क्यांनी वधारले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञानमध्ये १.३ टक्क्याची घसरण झाली. तर वीज, बहुपयोगी आणि वित्त निर्देशांक वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक मात्र जवळपास अध्र्या टक्क्याहून अधिक वाढले.

रुपया ७५ पर्यंत खाली

सलग चौथ्या सत्रात घसरण होत डॉलरच्या तुलनेत रुपयाने शुक्रवारी ७५ चा खालचा तळ नोंदवला. रुपया गेल्या दोन आठवड्यांत पहिल्यांदाच या टप्प्याखाली आला आहे. परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सत्रअखेर ७५.०२ वर स्थिरावले. त्यात गुरुवारच्या तुलनेत १२ पैशांनी घसरण झाली. सत्रात रुपयाचा प्रवास ७४.७५ ते ७५.०७ असा राहिला. स्थानिक चलनाची १२ एप्रिलनंतरची शुक्रवारची नीचांकी पातळी आहे. आठवड्यात सोमवारपासून चार सत्रांमध्ये रुपया ०.८९. टक्के म्हणजेच ६६ पैशांनी घसरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:12 am

Web Title: sensex nifty fall again abn 97
Next Stories
1 बँकांना लाभांश वितरणास मुभा
2 आठवड्याला १० हजार कोटींचा फटका
3 ‘रुपयात लवकरच ७६ खाली घसरण’
Just Now!
X