इराकमधील अराजकता आणि कच्च्या तेलाच्या दरातील चढाई याने सेन्सेक्सला सप्ताहअखेरही घसरणीला सामोरे जावे लागले. सलग तिसऱ्या व्यवहारात घसरताना मुंबई निर्देशांकाने आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी जवळपास शतकी आपटी नोंदविली. त्यासह निफ्टीही आता पंधरवडय़ाच्या तळात येऊन पोहोचला आहे.
प्रमुख निर्देशांकांनी ५ जून रोजी दाखविलेला तळ शुक्रवारी पुन्हा दाखविला.
गेल्या दोन दिवसांपासूनच्या घसरत्या सेन्सेक्समध्ये शुक्रवारी ९६.२९ अंश घट होत मुंबई निर्देशांक २५,१०५.५१ पर्यंत आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक २९.२५ अंश घसरणीसह ७५११.४५ वर येऊन थांबला आहे. दोन्हीही निर्देशांक त्यांच्या अनोख्या अशा अनुक्रमे २५,१०० व ७,५०० पर्यंत घसरले आहेत.
कमी मान्सूनच्या जोडीला आता महागाईचीही फोडणी बसण्याच्या चिंतेने गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेरिस विक्रीचा मारा केला. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, टाटा पॉवर, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प यांचे समभाग घसरले. वाहन कंपन्यांतील समभाग मूल्यांमधील घसरण ही कमी मान्सूनची भीती प्रतिबिंबित करणारी होती. गेल्या सलग तीन सत्रातील घसरण मिळून सेन्सेक्सचे ४१५.६८ अंश नुकसान झाले आहे. तर निर्देशांक आता ५ जूनच्या, २५,०१९.५१ या टप्प्यानजीक पोहोचला आहे. शुक्रवारी सेन्सेक्सचा वरचा स्तरही २५,२७६.३१ पुढे जाऊ शकला नाही. आठवडय़ाभरातील मुंबई निर्देशांकाची घसरण ही १२२.६६ अंशांची राहिली.
*कच्चे तेल: पिंपामागे पाच डॉलरने भाववाढ
इराकमधील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प अतिरेक्यांनी ताब्यात घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नऊ महिन्यांच्या उच्चांकाला जाऊन भिडले आहेत. शुक्रवारी कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय भाव प्रति पिंप ११५ डॉलपर्यंत गेला. सप्टेंबर २०१३ मध्ये तेलाचे दर सध्याच्या समकक्ष होते. गेल्या दहा दिवसांत तेलदर पिंपामागे ५ डॉलरने वाढले आहेत. वायदे बाजारात महिन्याभरानंतरच्या तेलासाठीची नोंदणी प्रति पिंप ११५ डॉलरने झाली. लंडनच्या बाजारात हे दरचित्र असतानाच अमेरिकेत मात्र १०६ डॉलरच्या दराने प्रति पिंपासाठी व्यवहार होत होते.
*डॉलरमागे १० पैशांनी रुपयाची घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी १० पैशांनी घसरताना ६०.१८ या टप्प्यावर येऊन पोहोचला. स्थानिक चलनातील हे सलग चौथे साप्ताहिक नुकसान ठरले. सप्ताहाअखेरच्या व्यवहाराची सुरुवात करतानाही रुपया ६०.२२ या नरम स्तरावरच होता. व्यवहारात तो ६०.३४ पर्यंत खाली आला. चालू आठवडय़ात रुपयातील घसरण ही ४१ पैशांची राहिली आहे. याच आठवडय़ात त्यातील प्रत्येकी दोन सत्रांतील घसरण ही ६० पैशांपर्यंतची होती.
*चांदी ४५ हजारांकडे
मौल्यवान धातूंच्या दरातील वाढ शुक्रवारी ठळकपणे नोंदली गेली. गेल्या काही दिवसांपासून २७ हजारांचा टप्पा पार करणारे स्टॅण्डर्ड सोने तोळ्यासाठी २८,१५० रुपये झाले. गुरुवारच्या तुलनेत त्यात एकदम ५८० रुपयांची भर पडली. चांदी तर किलोसाठी दीड हजार रुपयांनी वधारली. ४४,८५५ रुपयांचा भाव तिला मिळाला. त्यांचे दर आता ४५ हजार रुपयांपर्यंत गेले आहेत.