जागतिक भांडवली बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर येथील गुंतवणूकदारांनीही समभाग विक्रीचा सपाटा गुरुवारी लावला. परिणामी, प्रमुख निर्देशांकांची सलग तीन व्यवहारांतील तेजी थांबली.

सत्रात मुंबई निर्देशांक ९०५ अंशांपेक्षा कमीचे व्यवहार नोंदवत होता. दिवसअखेर मात्र तो काहीसा सावरला असला तरी बुधवारच्या तुलनेत त्यात घसरण झाली. सेन्सेक्स ५९८.५७ अंश घसरणीसह ५०,८४६.०८ वर स्थिरावला. तर निफ्टी १६४.८५ अंश घसरणीने १५,०८०.७५ वर बंद झाला.

एकाच व्यवहारातील ६०० अंश घसरणीने सेन्सेक्सने त्याचा ५१ हजारांचा स्तरही सोडला. तर दीडशेहून अधिक अंश घसरणीमुळे निफ्टी १५ हजारांवर येऊन ठेपला. बुधवारच्या तुलनेत प्रमुख निर्देशांक एक टक्क्य़ाने खाली आले.