आठवडय़ापासून वरच्या मूल्यावर असलेल्या समभागमूल्यांची अधिक संख्येने विक्री करून सप्ताहअखेरीस नफा पदरात पाडून घेण्याचा मोह गुंतवणूकदारांना आवरता आला नाही. शेवटच्या सत्रात ५०० हून अधिक घसरण नोंदविण्यास भाग पाडत गुंतवणूकदारांनी अखेर मुंबई निर्देशांकाला ४९ हजारांवर आणून ठेवले. तर गुंतवणूकदारांच्या या धोरणामुळे निफ्टीलाही दीडशेहून अधिक अंश घसरणीला सामोरे जात १४,५०० च्या खाली यावे लागले.

मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा गेल्या काही सलग सत्रांपासून तेजीमुळे विक्रमी शिखरांचा प्रवास सुरू आहे. शुक्रवारी मात्र त्याला मोठय़ा घसरणीच्या रूपात खीळ बसली.

सेन्सेक्स तब्बल ५४९.४९ अंश घसरणीने थेट ४९,०३४.६७ वर स्थिरावला. तर निफ्टी १६१.९० अंश घसरणीमुळे १४,४३३.७० पर्यंत येऊन थांबला. सप्ताहात दोन्ही निर्देशांक मात्र अनुक्रमे २५२.१६ व ८६.४५ अंश वाढ नोंदविणारे ठरले.

गेल्या काही सत्रांपासून तेजी नोंदविले जाणाऱ्या माहिती तंत्रज्ञानातील समभागांची विक्री झाल्याने गुंतवणूदारांनी नफेखोरी केल्याचे स्पष्ट झाले. टेक महिंद्र घसरणीत आघाडीवर होता. तसेच ओएनजीसी, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, हिंदुस्थान यूनिलिव्हरचे समभागही घसरले. मुंबई निर्देशांकातील भारती एअरटेल, आयटीसी, बजाज ऑटो, बजाज फायनान्स या चार कंपन्यांच तेजीत होत्या.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, बहुपयोगी वस्तू, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू असे अधिकतर निर्देशांक २.४३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर दूरसंचार ३.६८ टक्क्यांनी वाढला.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप सव्वा टक्क्यापर्यंत वाढले.

गुंतवणूकदारांच्या २.२३ लाख कोटींच्या संपत्ती ऱ्हास

सप्ताहअखेरच्या एकाच व्यवहारातील एक टक्क्याहून अधिकची निर्देशांक आपटी नोंदविणाऱ्या देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता शुक्रवारी थेट २.२३ लाख कोटी रुपयांनी कमी झाली. मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सत्रअखेर १९५.४३ लाख कोटी रुपये झाले. सेन्सेक्ससह निफ्टी दिवसभर तेजी-मंदी असे हेलकावे खात होता. व्यवहारबंदला दोन्ही निर्देशांक सत्रातील तळाला विसावले.