सेन्सेक्स, निफ्टीत सलग चौथी वाढ; सप्ताहारंभी गुंतवणूकदारांची खरेदी

मुंबई : भांडवली बाजारातील तेजी सलग चौथ्या व्यवहारातही कायम राहिली. सप्ताहारंभीची खरेदी करताना गुंतवणूकदारांनी औषधनिर्माण, ऊर्जा तसेच बँक क्षेत्रातील समभागांना पसंती दिल्याने प्रमुख निर्देशांक त्यांच्या अनोख्या टप्प्यासमीप पोहोचले आहेत.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी २९५.९४ अंश वाढीसह ४९,५०२.४१ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११९.२० अंश वाढीमुळे १४,९४२.३५ पर्यंत स्थिरावला.

शतकांहून अधिक अंश भर टाकल्याने सेन्सेक्स तसेच निफ्टी अनुक्रमे ५० हजार व १५ हजार या अनोख्या स्तराच्या वेशीवर आहे. सेन्सेक्स तसेच निफ्टीने गेल्या चार व्यवहारात मिळून जवळपास अडीच टक्क्य़ांची वाढ नोंदविली आहे.

देशात जागतिक स्तरावर करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र त्याकडे काहीसे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी आठवडय़ाची सुरुवात करताना आघाडीच्या समभागांची खरेदी केली. कंपन्यांचा तिमाही नफा तसेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाचीही दखल बाजाराने घेतली.

मुंबई शेअर बाजारातील प्रमुख ३० कंपनी समभागांपैकी लार्सन अँड टुब्रो, डॉ. रेड्डीज् लॅब, सन फार्मा, एनटीपीसी, पॉवरग्रिड, इंडसइंड बँक, ओएनजीसी, महिंद्र अँड महिंद्र या कंपन्यांचे समभाग मूल्य ४ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रिज, एचसीएल टेक्नॉलॉजिज्, अ‍ॅक्सिस बँक यांचे मूल्य मात्र तेजीच्या बाजारातही काही प्रमाणात घसरले. सेन्सेक्सच्या समभाग मूल्य घसरणीच्या यादीत पाच कंपन्यांचा समावेश राहिला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, भांडवली वस्तू, आरोग्यनिगा, ऊर्जा, बहुपयोगी वस्तू, उद्योग निर्देशांक ३.५३ टक्क्य़ांपर्यंत वाढले. तर माहिती तंत्रज्ञान निर्देशांक काही प्रमाणात घसरला.