अवघ्या एका दिवसाच्या फरकाने प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारी पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित केला. चालू आठवडय़ातच जाहीर होणाऱ्या कंपन्यांच्या वित्तीय निष्कर्षांबाबत आशावाद व्यक्त करताना गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या सत्रात जोरदार खरेदी केली. परिणामी सेन्सेक्स ३१,७५० नजीक तर निफ्टी ९,८०० जवळ पोहोचला.

सोमवारच्या तुलनेत सेन्सेक्ससह निफ्टीची वाढ किरकोळ राहिली. मात्र त्या जोरावरही मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशाकाला सप्ताहारंभीच्या आणखी विक्रमापुढे जाता आले. ३१.४५ अंशवाढीसह सेन्सेक्स ३१,७४७.०९ वर बंद झाला; तर १५ अंशवाढीसह निफ्टी ९,७८६.०५ पर्यंत स्थिरावला.

कंपन्यांच्या यंदाच्या तिमाही वित्तीय निष्कर्ष हंगामाला टीसीएस व इन्फोसिसच्या अनुक्रमे गुरुवार व शुक्रवारी सुरुवात होणार आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे कंपन्यांचे आर्थिक निकाल वाढीव नफ्याचे असतील, असे मानले जात आहेत. याच आशेवर गुंतवणूकदारांनी मंगळवारीदेखील समभाग खरेदीचे धोरण अनुसरले.

गेल्या दोन दिवसांच्या विक्रम कालावधीत मुंबई निर्देशांकाने ३८६.४५ अंश भर नोंदविली आहे. सोमवारी तांत्रिक अडचणीपोटी अडीच ते तीन तास व्यवहार विस्कळीत होऊनही निफ्टीने सेन्सेक्सप्रमाणे सर्वोच्च स्तर अनुभवला होता.

३१,७८९.५० या वरच्या टप्प्यावर सुरुवात करणारा सेन्सेक्स व्यवहारात ३१,८८५.११ पर्यंत झेपावला, तर ९,८००चा स्तर ओलांडताना निफ्टी सत्रात ९,८३०.०५ पर्यंत गेला होता.

मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक मंगळवारी वाढले असले तरी स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झाली. किरकोळ गुंतवणूकदारांच्या या गटातील समभाग विक्रीमुळे मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.७९ व ०.५८ टक्क्यांपर्यंत घसरले.

chart

मुंबई शेअर बाजारात क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान सर्वाधिक, ०.९१ टक्क्याने वाढला. पाठोपाठ वाहन, भांडवली वस्तू, ऊर्जा, तेल व वायू निर्देशांकही जवळपास याच प्रमाणापर्यंत वाढले. तर स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्यनिगा, सार्वजनिक उपक्रम घसरणीच्या यादीत राहिले.

सेन्सेक्समधील ३० पैकी १६ कंपन्यांचे मूल्य वाढले. यामध्ये बजाज ऑटो, टाटा मोटर्स, एनटीपीसी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, इन्फोसिस, टीसीएस, हिंदुस्थान यूनिलिव्हर, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश राहिला.

भांडवली बाजाराची नजर आता बुधवारी जाहीर होणाऱ्या महागाई व औद्योगिक उत्पादन दरावर असेल. बाजाराचे प्रमुख निर्देशांक विक्रमाचा फेरा तिसऱ्या सत्रातही पार पाडतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बुधवारच्या बैठकीकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.