सलग दोन व्यवहारांत नवा उच्चांक गाठणाऱ्या शेअर बाजाराचा प्रवास आता सेन्सेक्सला २२,१००च्या उंबरठय़ावर, तर निफ्टीला ६,६०० पल्याड शिखराकडे नेणारा ठरला आहे. बुधवारच्या सत्राची सुरुवातच ऐतिहासिक टप्प्यासह करणाऱ्या सेन्सेक्सने दिवसअखेरही ४०.०९ अंश वाढ नोंदवीत २२,०९५.३० अशा उच्चांकावर विसावून केली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ११.६५ अंश भर पडल्याने हा निर्देशांकही ६,६०१.४०या सर्वोच्च पदावर विराजमान होत स्थिरावला.
चालू आठवडय़ात सलग दोन दिवस नव्या विक्रमाला स्पर्श करणाऱ्या सेन्सेक्सने बुधवारची सुरुवातच २२,१३४.७१ या वरच्या टप्प्यावर केली. दुपारच्या सत्रात ही घोडदौड थेट २२,१७२.२० वर पोहोचली. उल्लेखनीय म्हणजे सेन्सेक्स दिवसभरात २२ हजारांखाली गेलाच नाही. तर निफ्टीचा व्यवहारातील उच्चांक ६,६२७.४५ असा होता. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये दुपारनंतर गुंतवणूकदारांनी नफेखोरी अवलंबली तरी सार्वकालिक उच्चांकापासून त्यांनी माघार घेतली नाही.
भारताची प्रगत अर्थव्यवस्था आणि चलन बाजारातील सात महिन्यांच्या भक्कमतेवरील रुपया यांच्या जोरावर विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या निधीचा ओघ गेल्या दोन दिवसांपासून भांडवली बाजारात कायम आहे. अमेरिकेसह प्रमुख आशियाई बाजारातील तेजीही त्याला कारणीभूत ठरत आहे.

रुपयाचेही पुन्हा डॉलरमागे ‘साठी’कडे उत्साही वळण
सलग चौथ्या दिवशी वधारणाऱ्या रुपयाने आठ महिन्यांपूर्चीच्या उच्चांकाकडे पुन्हा वळण घेणारी झेप बुधवारी नोंदविली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेच स्थानिक चलन ३४ पैशांनी उंचावत ६०.१४ वर पोहोचले. सहा ते आठ महिन्यांपूर्वीच्या उच्चांकाच्या दिशेने प्रवास चलनाने गेल्या चार व्यवहारांत नोंदविला आहे. केवळ चार दिवसांत रुपया तब्बल १२० पैशांनी उंचावून पुन्हा डॉलरमागे साठीच्या दिशेने वळला आहे. रुपयाचा आजचा टप्पा हा  २९ जुलै २०१३ रोजीच्या ५९.४१ या पातळीनजीक आहे.