सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ; तर निफ्टीत नाममात्र घसरण

मुंबई : दोलायमान व्यवहारातील भांडवली बाजाराचा सप्ताहअखेरचा प्रवास संमिश्र राहिला. सलग दोन सत्रांतील घसरणीनंतर सेन्सेक्स शुक्रवारी किरकोळ प्रमाणात वाढला. तर नाममात्र वाढीसह निफ्टीने तेजी कायम ठेवली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आठवड्याच्या शेवटच्या सत्रात ४१.७५ अंश वाढीने ४८,७३२.५५ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १८.७० टक्के घसरण होऊन प्रमुख निर्देशांक १४,६७७.८० पर्यंत स्थिरावला.

भांडवली बाजारात पुन्हा एकदा वाढत्या करोना साथ आणि टाळेबंदीबाबतची चिंता गुंतवणूकदारांनी व्यक्त झाली. दोन्ही प्रमुख निर्देशांक चालू आठवड्यात त्यांच्या अनोख्या टप्प्यापासून आणखी दूर गेले.

चालू आठवड्यात मुंबई निर्देशांकात जवळपास ५०० अंश घसरण नोंदली गेली आहे. तर निफ्टीही जवळपास एक टक्क्यापर्यंत खाली आला. या दरम्यान भांडवली बाजारात चार दिवस व्यवहार झाले.

शुक्रवारी सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपनी समभागांपैकी एशियन पेंट्स सर्वाधिक, ८.५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढला. कंपनीने मार्च २०२१ अखेरच्या तिमाहीत ८१ टक्के नोंदवलेल्या नफ्याचा हा परिणाम ठरला.

आयटीसी, नेस्ले इंडिया, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्थान यूनिलिव्हर, पॉवरग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीजचेही मूल्य आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारात काही प्रमाणात वाढले. तर इंडसइंड बँक, महिंद्र अँड महिंद्र, डॉ. रेड्डीज्, स्टेट बँक, एनटीपीसी, ओएनजीसी आदी मात्र जवळपास ३ टक्क्यांपर्यंत घसरले. मुंबई निर्देशांकातील २० समभाग घसरणीच्या यादीत होते.

रुपयाचा सप्तसप्ताह उच्चांक

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारात त्याच्या गेल्या सात सप्ताहांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले. सप्ताहअखेरच्या सत्रात स्थानिक चलन १३ पैशांनी भक्कम होत ७३.२९ रुपयांवर झेपावले. रुपयाचा हा ३१ मार्चनंतरचा सर्वात वरचा टप्पा ठरला. चालू आठवड्यात रुपया २२ पैशांनी वाढला आहे. सप्ताहअखेरच्या व्यवहारादरम्यान तो ७३.२२ पर्यंत उंचावला होता.