भांडवली बाजारातील निर्देशांक वाढ नव्या सप्ताहारंभीदेखील कायम राहिली. सेन्सेक्स व निफ्टीने सोमवारच्या माफक प्रमाणातील वाढीसह सलग तिसरी निर्देशांक तेजी नोंदविली. दोन्ही निर्देशांक गेल्या सप्ताहअखेरच्या तुलनेत अध्र्या टक्क्यापर्यंत वाढले.

सोमवारच्या व्यवहारात जवळपास ४०० अंश वाढ नोंदविल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्रअखेर शुक्रवारच्या तुलनेत १४१.५१ अंश वाढीसह ३८,१८२.०८ वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५६.१० अंश वाढीने ११,२७०.१५ पर्यंत पोहोचला.

देशी कंपन्यांना मूल्यबळ

देशांतर्गत संरक्षण सामग्री निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले. या अंतर्गत विविध १०१ शस्त्रांस्त्रांसह हलकी लढाऊ हेलिकॉप्टर, वाहतूक विमाने, पारंपरिक पाणबुडय़ांसारखी शस्त्रसामग्री वाहून नेणारी साधने आणि क्रूझ क्षेपणास्त्रांच्या आयातीवर वर्ष २०२४ पर्यंत निर्बंध लागू केले. या निर्णयाचा अपेक्षित परिणाम भांडवली बाजारात सूचिबद्ध देशी संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या समभाग मूल्यांवर सोमवारच्या व्यवहारात दिसून आला.