भांडवली बाजारात अर्थआशेचा किरण..

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान आणि टाळेबंदीसारख्या र्निबधांच्या कालावधीत अर्थआशेचा किरण दाखवणाऱ्या कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या ताज्या हंगामाचे भांडवली बाजाराने जोरदार स्वागत केले. गुरुवारी याच आशावादी वातावरणात माहिती तंत्रज्ञान, बँक, वित्त क्षेत्रातील समभागांना गुंतवणूकदारांनी खरेदीचा हात दिल्याने प्रमुख निर्देशांकांना त्यांचे नवीन शिखर टप्पे गाठता आले.

अर्धा टक्के वाढीने सेन्सेक्स व निफ्टीने त्याचा आठवडय़ापूर्वीचा ऐतिहासिक टप्पा तेजीतील सातत्याने विनासायास पार केला. व्यवहारात ५३,२६६.१२ पर्यंत मजल मारणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेर २५४.७५ अंश झेपसह ५३,१५८.८५ या यापूर्वी कधीही न पाहिलेल्या पातळीवर स्थिरावला. तर निफ्टी ७०.२५ अंशवृद्धीने १५,९२४.२० पर्यंत स्थिरावला. तो आता १६ हजारांच्या वेशीवर पोहोचला आहे.

सेन्सेक्सने महिन्याभरापूर्वीच सत्रात ५३ हजाराला स्पर्श केला होता. वर्ष २०२१ च्या सुरुवातीला सेन्सेक्स प्रथमच ५० हजाराला पोहोचला होता. तर ५२ हजाराचा टप्पा गाठण्यास त्याला त्यानंतर महिन्याचा कालावधी लागला. तुलनेत ५३ हजारी अनुभव घेण्यासाठी मुंबई निर्देशांकाने   तिमाहीपेक्षा अधिक वेळ घेतला आहे.

आठवडय़ाच्या चौथ्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० पैकी एचसीएल टेक, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्र, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, टाटा स्टील आदींचे मूल्य वाढले. तर भारती एअरटेल, महिंद्र अँड महिंद्र, एशियन पेंट्स, टायटन कंपनी, सन फार्मा या समभागांना मूल्यनुकसान सोसावे लागले.

निर्देशांकाच्या विक्रमी तेजीला गुरुवारी स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, वित्त व बँक तसेच पोलाद निर्देशांकांनी ४ टक्क्यांपर्यंत वाढीने साथ दिली. तर तेल व वायू, दूरसंचार, ऊर्जा, वाहन निर्देशांकांत एक टक्क्यापर्यंत घसरण झाली. छोटय़ा गुंतवणूकदारांच्या पसंतीचे मिड व स्मॉल कॅपही वाढले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या तिमाही निकालाने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह असून अर्थउभारीचे ते प्रतीक मानले जात आहे, असे एलकेपी सिक्युरिटीजचे प्रमुख संशोधक एस. रंगनाथन म्हणाले. आशियाई बाजारातील सकारात्मकता पथ्यावर पडल्याचे त्यांनी सांगितले.

तीन दिवसांत २.२२ लाख कोटींची भर

सलग तीन सत्रातील तेजी दरम्यान मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल २.२२ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. अर्थात गुंतवणूकदारांची संपत्ती झालेली ही भर आहे. भांडवली बाजाराचा प्रमुख निर्देशांक – सेन्सेक्सने या तीन दिवसांत ७८६.१६ अंशांनी झेपावत विक्रमी उंचीला गाठले आहे.