भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकात मंगळवारी सप्ताहारंभीच्या तुलनेत किरकोळ वाढ नोंदली गेली. मात्र तरीदेखील सेन्सेक्स व निफ्टीने नवा विक्रम रचला.

आठवडय़ातील दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला नफेखोरीने काही कालावधीसाठी निर्देशांकांना खाली आणणाऱ्या गुंतवणूकदारांनी व्यवहारअखेर त्यात नाममात्र वाढ नोंदविण्यास भाग पाडले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९.७१ अंशांनी वाढून ४६,२६३.१७ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९.७० अंशवाढीसह १३,५६७.८५ पर्यंत स्थिरावला. मंगळवारच्या तुलनेत दोन्ही निर्देशांकांत अवघी ०.०५ टक्केपर्यंत वाढ नोंदली गेली.

मुंबई निर्देशांकाच्या प्रमुख ३० कंपनी समभागांमध्ये बजाज फायनान्स सर्वाधिक, ४.६९ टक्क्यांसह वाढला. तसेच बजाज फिनसव्‍‌र्ह, एचडीएफसी लिमिटेड, टेक महिंद्र, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टीलही वाढले, तर हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक, टीसीएस, आयटीसी आदी २ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, वित्त, बँक, पोलाद आदी एक टक्क्याने वाढले, तर तेल व वायू, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप ०.४२ टक्क्याने घसरला, तर स्मॉल कॅप ०.०७ टक्क्याने वाढला.