विक्रमी टप्प्यावरील प्रमुख निर्देशांकांनंतर वाढत्या समभागमूल्याचा लाभ पदरात पाडून घेण्याचा मोह गुंतवणूकदारांना गुरुवारी आवरता आला नाही. परिणामी दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये पाव टक्क्य़ापर्यंत घसरण होऊन ते बुधवारच्या विक्रमी टप्प्यापासून माघारी फिरले. यामुळे सेन्सेक्सच्या सलग पाच तर निफ्टीच्या सलग सात व्यवहारातील तेजीलाही खीळ बसली.

सलग निर्देशांकवाढ नोंदवत मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक बुधवापर्यंत त्यांच्या ऐतिहासिक टप्प्यापर्यंत पोहोचले होते. असे करताना सेन्सेक्स ४६,१०० तर निफ्टी १३,५०० पुढे झेपावला होता. गुरुवारी मात्र जागतिक भांडवली बाजारातील नरमाईच्या सावटाने दोन्ही निर्देशांक खाली आले.

१४३.६२ अंश घसरणीसह सेन्सेक्स ४५,९५९.८८ वर तर ५०.८० अंश घसरणीने १३,४७८.३० वर स्थिरावला. सेन्सेक्सने ४६ हजाराचा तर निफ्टीने १३,५०० चा स्तर गुरुवारी सोडला.

सिमेंट कंपन्यांच्या भारतीय स्पर्धा आयोगाने दिलेल्या चौकशी आदेशामुळे अल्ट्रटेक सिमेंटसारखा समभाग सेन्सेक्समध्ये सर्वाधिक, ३.२७ टक्के मूल्य नुकसान सोसणारा समभाग ठरला. अंबुजा सिमेंट, एसीसीचेही मूल्य आपटले.