भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी सलग तिसरी वाढ नोंदवली. गेल्या दोन व्यवहारांच्या तुलनेत ती अधिक ठरली. सेन्सेक्स व निफ्टीत मंगळवारच्या तुलनेत प्रत्येकी जवळपास दीड टक्के वाढ झाली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८९.७० अंश वाढीने ४९,७३३.८४ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २११.५० अंश वाढीसह १४,८६४.५५ पर्यंत स्थिरावला.

कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निकालाचे स्वागत गुंतवणूकदारांकडून कायम राहिले.

सेन्सेक्समधील प्रमुख तेजीच्या समभागांमध्ये बजाज समूहातील बजाज फायनान्स व बजाज फिनसर्व्हची कामगिरी उल्लेखनीय राहिली. दोन्ही कंपनी समभाग प्रत्येकी ८.३२ व ४.०६ टक्क््यांनी वाढले.

तीन सत्रात ६.३९ लाख कोटींची वाढ

सलग तीन व्यवहारातील सेन्सेक्स तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती या दरम्यान ६.३९ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. मुंबई निर्देशांक गेल्या सलग तीन सत्रात मिळून १,८५५.३९ अंशांनी वाढला आहे. टक्केवारीत हे प्रमाण जवळपास ४ आहे. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य बुधवारअखेर २०८.७६ लाख कोटी रुपये झाले आहे. या तीन व्यवहारात त्यात ६,३९,४३७.३१ कोटी रुपयांची भर पडली आहे.