भांडवली बाजारात गुंतवणूकदारांना निर्देशांकाच्या मोठय़ा पडझडीचा गुरुवारी आघात सोसावा लागला. बाजारावर मंदीवाल्यांनी पकड मिळविल्याचे स्पष्ट करणारी ही सलग सहाव्या सत्रात दिसून आलेली घसरण आहे. परिणामी सेन्सेक्सने ३७ हजारांची आणि निफ्टीने १०,९०० या तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाच्या पातळ्या तोडल्याचे दिसून आले.

जगभरातील भांडवली बाजारातील निर्देशांकांच्या पडझडीचे अनुकरण करीत ‘सेन्सेक्स’ गुरुवारी १,११४.८२ अंशांनी गडगडला आणि दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा ३६,५५३.६० पातळीवर विसावला. निफ्टी निर्देशांकही ३२६.३० अंश गमावून १०,८०५.५५ या महत्त्वाच्या आधार पातळीच्या वेशीवर स्थिरावलेला दिसून आला. या पडझडीतून बाजारात सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य ४ लाख कोटी रुपयांनी रोडावले. अर्थात गुंतवणूकदारांच्या मत्तेचा इतक्या प्रमाणात चुराडा बाजारातील समभाग विक्रीच्या सपाटय़ाने केले.

जगभरात सर्वत्र करोना विषाणूबाधेची साथीने डोके वर काढले असून, त्या परिणामी पुन्हा टाळेबंदी लागू केल्यास अर्थव्यवस्थेची फेरउभारणी आणखी लांबणीवर जाण्याची भीती बळावली आहे. त्यातच अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांमध्ये अर्थप्रोत्साहनाच्या ‘पॅकेज’संबंधी अनिश्चिततेमुळे, बुधवारी अमेरिकी बाजारात निर्देशांकात मोठी पडझड दिसून आली. त्याचेच प्रतिबिंब स्थानिक बाजारातील निर्देशांकाच्या तीव्र घसरणीत उमटताना दिसून आले.

गेले काही दिवस निर्देशांक घसरणीत असतानाही, चमकणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना गुरुवारच्या पडझडीचा सर्वाधिक फटका बसला.

रुपया ३२ पैसे कमजोर

देशांतर्गत डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या मूल्यात तीव्र स्वरूपाची घसरण गुरुवारी दिसून आली. रुपयाचे विनिमय मूल्य प्रति डॉलर ३२ पैशांनी गडगडून, ७३.८९ या पातळीवर पोहचले. रुपयाचे मूल्य महिनाभरापूर्वी मागे सोडलेल्या पातळीवर रोडावले आहे.

सोने-चांदी दराला मोठा फटका

रुपयातील कमजोरीचा सोन्या-चांदीच्या किमतीवर विपरित परिणाम दिसून आला. सलग चौथ्या दिवसातील घसरणीत सोने अडीच हजारांनी स्वस्त होऊन, ५० हजारांखाली गुरुवारी विसावले. गुरुवारी सराफ बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत महिनाभरानंतर प्रथमच ५० हजारांखाली म्हणजे ४९,८२२ रुपयांवर विसावली. ५१,६१२ रुपये या सोमवारच्या किमतीच्या तुलनेत सोने १,८०० रुपयांनी खाली आले आहे. गुरुवारच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत किलोमागे २,४३५ रुपयांचा तीव्र स्वरूपाचा उतार दिसून आला. सोमवारपासून चांदीनेही ८,५४० रुपयांचे मोल गमावले आहे.