मुंबई : देशातील करोना प्रसारानंतर लागू टाळेबंदीचे निर्बंध शिथील होत असल्याचे स्वागत गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभी जोरदार समभाग खरेदीने केले. परिणामी सेन्सेक्स तसेच निफ्टीदेखील त्यांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी २२८.४६ अंश झेपसह प्रथमच ५२,३२८.५१ वर विराजमान झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८१.४० अंश वाढीने १५,७५१.६५ या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला.

सेन्सेक्समध्ये बँक, माहिती तंत्रज्ञान समभागांचे वर्चस्व राहिले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बहुपयोगी वस्तू, ऊर्जा, दूरसंचार, तेल व वायू आदी सर्वाधिक फरकाने वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप हे किरकोळ गुंतवणूकदारांच्या पसंतीचे निर्देशांक प्रत्येकी जवळपास एक टक्क्य़ाहून अधिक वाढले.

भारतातील नव्या करोनाबाधितांची संख्या सोमवारी १ लाखांवर नोंदली गेली असून गेल्या ६१ दिवसातील ती सर्वात कमी प्रतिदिन संख्या आहे. तर करोना असणाऱ्यांची आतापर्यंतची संख्या कमी होत १४.०१ लाखांवर येऊन ठेपली आहे.

बाजार भांडवलही विक्रमी

देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजाराचे बाजार भांडवल सोमवारच्या विक्रमी तेजीमुळे इतिहासात प्रथमच २२९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सेन्सेक्सच्या एकाच व्यवहारातील जवळपास अर्धा टक्के वाढीमुळे बाजार भांडवलात सप्ताहारंभी १.८१ लाख कोटी रुपयांची भर पडली.

गुंतवणूकदार संख्येतही विक्रम

मुंबई शेअर बाजारातील वापरकर्त्यांची संख्या सोमवारी ७ कोटींवर पोहोचली. भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या एक कोटीने वाढण्यास १३९ दिवस लागल्याचे बाजाराचे मुख्याधिकारी आशिष कुमार चौहान यांनी सांगितले. ७ कोटींपैकी सर्वाधिक ३८ टक्के गुंतवणूकदार हे ३० ते ४० वयोगटातील आहेत.