मुंबई : भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे सलग पाच सत्रात सुरू राहिलेल्या तेजीला लगाम घातला गेला. बुधवारी सकाळच्या सत्रात निर्देशांकांची नव्या विक्रमी शिखरांच्या दिशेने आगेकूच ही अल्पजीवी ठरली आणि गुंतवणूकदारांच्या नफावसुलीने तिला ग्रहण लावले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात ५८ हजारांच्या दिशेने कूच करणारी झेप घेतली. ५७,९१८.७१ अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीला त्याने स्पर्श केला. मात्र उत्तरार्धात गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफावसुलीमुळे सेन्सेक्समध्ये घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेस २१४.१८ अंशांच्या घसरणीसह ५७,३३८.२१ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने देखील १७,२२५.७५ अंशांची ऐतिहासिक पातळी गाठली होती. दिवसअखेरीस निफ्टीही ५५.९५ अंशांच्या घसरणीसह  १७,०७६.२५ पातळीवर स्थिरावला.

माहिती तंत्रज्ञान, धातू आणि वाहन निर्माण कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली. मात्र ग्राहकोपयोगी उत्पादनांशी संबंधित कंपन्यांच्या समभागांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती.

वाहन कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या समभागांमध्ये घसरण बघायला मिळाली. महिंद्रच्या समभागात सर्वाधिक २.९५ टक्के घसरण झाली. त्यापाठोपाठ टाटा स्टील, बजाज फिनसव्र्ह, टीसीएस, एचडीएफसी, इन्फोसिस आणि एचसीएल टेकच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. मात्र एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, डॉ. रेड्डीज, टायटन आणि लार्सन अँड टुब्रोचे समभाग प्रत्येकी ३.२० टक्क्यांपर्यंत वधारले होते.

अर्थउभारीचा संकेत देत मोठ्या उसळीसह आलेल्या जीडीपी आकडेवारीमुळे सकाळच्या सत्रात भारतीय भांडवली बाजाराने नवीन उच्चांक गाठला. मात्र उच्च मूल्यांकन हे लालसेला कारण ठरले. परिणामी झालेल्या विक्री व नफावसुलीमुळे निर्देशांकात घसरण झाली, असे जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी मत व्यक्त केले.

‘वेदान्त’कडून १८५० टक्के लाभांश

वेदान्त लिमिटेडच्या संचालक मंडळाने, भरघोस लाभांश वाटपाच्या परंपरेला अनुसरून, बुधवारी १८५० टक्क्यांच्या अंतरिम लाभांशाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या समभागावर प्रत्येकी १८.५० रुपये अंतरिम लाभांश देऊ करण्यात आला आहे.