लोकसभा निवडणुकांच्या लाटेवर गेल्या काही दिवसांपासून विक्रमी तेजीवर आरूढ असलेल्या भांडवली बाजाराची तेजी बुधवारी निमाली.  निवडणूक निकालानंतरच्या चौथ्या दिवशी गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने सेन्सेक्स ७८.८६ अंशांनी घसरत २४,२९८.०२ वर आला, तर २२.६० अंश घसरणीने निफ्टी ७,२५२.९० पर्यंत खाली आला.
भाजपप्रणीत लोकशाही आघाडीला केंद्रात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होण्याच्या चित्रानंतर गेल्या सलग चार व्यवहारांत प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी टप्पा गाठला होता. असे करताना व्यवहारात सेन्सेक्समध्ये तब्बल ५६२ अंशांची भर पडली. १६ मे रोजी सेन्सेक्स २५,३७५.६३, तर निफ्टी ७,५६३.५० पर्यंत गेला होता.
मंगळवारच्या व्यवहारात काही काळ नफेखोरीचा अवलंब करणाऱ्या गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात तो काहीसा विस्तारला. चढय़ा दरावर समभागांची विक्री करत गुंतवणूकदारांनी भांडवली वस्तू, बँक, तेल व वायू, आरोग्य निगा क्षेत्रातील समभागांना प्राधान्य दिले.
किरकोळ गुंतवणूकदारांची पसंती असलेले स्मॉल व मिड कॅपमध्ये खरेदीचे व्यवहार होत होते.  हे निर्देशांक अनुक्रमे १.८४ व १.३४ टक्क्यांनी उंचावले, तर सेन्सेक्समधील २१ कंपनी समभागांचे मूल्य घसरले. १.६३ टक्क्यांसह भांडवली वस्तू क्षेत्रीय निर्देशांकाला मोठय़ा घसरणीला सामोरे जावे लागले.