करोनाधास्तीने गुंतवणूकदारांचे सप्ताहारंभी विक्रीधोरण; ठप्प अर्थव्यवस्थेबद्दलही चिंता व्यक्त

करोनाबाधितांची वाढती संख्या, टाळेबंदीमुळे ठप्प पडलेली अर्थव्यवस्था यांचे चिंतासावट पुन्हा एकदा भांडवली बाजारावर पडू लागले आहेत. गेल्या आठवडय़ात सलग तेजी नोंदविणारे येथील भांडवली बाजारांचे प्रमुख निर्देशांक सप्ताहारंभी मात्र मोठय़ा अंशफरकांनी खाली आले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारअखेर तब्बल १,३७५.२७ अंशांनी घसरून २८,४४०.३२ पर्यंत येऊन ठेपला. दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत ४.६१ टक्क्य़ांपर्यंत आपटणाऱ्या मुंबई निर्देशांकाने व्यवहारात १,५०० अंश आपटी अनुभवली होती. सत्रअखेरही त्याचा २९ हजाराखालील स्तर कायम राहिला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक आठवडय़ाच्या पहिल्या सत्रअखेरिस ३७९.१५ अंशांनी घसरून ८,२८१.१० वर स्थिरावला. त्यातही ४ टक्क्य़ांहून अधिक आपटी नोंदली गेली. भांडवली बाजारात बँक, वित्त तसेच वाहन क्षेत्रातील समभागांचा अधिक विक्री दबाव राहिला.

भारतात करोनाबाधितांच्या संख्येने १,००० चा आकडाही ओलांडला आहे. तर विषाणूमुळे ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एकूणच टाळेबंदीमुळे व्यवहार ठप्प पडल्याचे सावट बाजारात उमटले. टाळेबंदीमुळे देशाच्या अर्थविकासाबाबत पतमानांकन संस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हाची चिंताही गुंतवणूकदारांनी वाहिली.

परिणामी गेल्या काही व्यवहारात निर्देशांक तेजी नोंदविणारे प्रमुख भांडवली बाजार सोमवारी मात्र घसरले. सेन्सेक्समध्ये ३० पैकी अवघे ६ कंपनी समभागांचेच मूल्य वाढले. तर निर्देशांक घसरणीच्या यादीत बजाज फायनान्स, एचडीएफसी लिमिटेड, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, मारुती सुझुकी आदी १० टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, वित्त, बँक, वाहन, दूरसंचार आदी ७ टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर आरोग्यनिगा व बहुपयोगी उत्पादन निर्देशांक वाढले.

तेल, रुपयात आपटी

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतीने सोमवारी गेल्या १७ वर्षांचा तळ नोंदविला. काळे सोने ब्रेंट क्रूड प्रथमच २००२ नंतरच्या (२३.५० डॉलर प्रति पिंप) स्तरावर येऊन ठेपले. सत्रातील किंमत घसरण ५ डॉलरहून अधिक राहिली. तर भारतात परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आणखी घसरत ७५.५९ पर्यंत येऊन ठेपले. व्यवहारअखेर त्यात ७० पैसे आपटी नोंदली गेली.

‘भारताला फायदा’

तेलाच्या किंमतीत १०% घट झाल्याचा परिणाम चलनवाढीवर अर्ध्या टक्क्य़ापर्यंत पडतो. खनिज तेलाच्या किंमतीत प्रति पिंप १० डॉलर घसरण झाल्यास देशाचे अंदाजे १६.३ अब्ज डॉलर विदेशी चलन वाचू शकेल.

– ज्योती रॉय, एंजल ब्रोकिंग.