मुंबई : अमेरिकेच्या नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांचा शपथविधी होत असतानाच जागतिक महासत्तेद्वारे जाहीर होणाऱ्या अर्थसाहाय्याच्या आशेवर भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक बुधवारी नव्याने शिखरावर पोहोचले. या रूपाने त्यांनी आठवडय़ात गाठलेला उच्चांकही मागे टाकला.

आठवडय़ातील तिसऱ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स थेट ३९३.८३ अंश वाढ घेत ४९,७९२.१२ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२३.५५ अंश झेप घेत १४,६४४.७० पर्यंत उंचावला. दोन्ही निर्देशांकात मंगळवार तुलनेत जवळपास एक टक्का भर पडली.

अमेरिकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांचा शपथविधी बुधवारी उशिरा पार पडला. तेव्हा १.९ लाख कोटी डॉलरच्या अर्थसाहाय्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची आशा निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या नवनियुक्त अर्थमंत्री जेनेट येलेन यांनीही त्याबाबतचे सुतोवाच केले आहे.

प्रवासी वाहन किंमतवाढीच्या घोषणेनंतर मारुती सुझुकीचा समभाग सलग दुसऱ्या दिवशी वाढला. बुधवारी तो २.७५ टक्के वाढीसह सेन्सेक्समधील तेजीयादीत अग्रणी राहिला. तसेच टेक महिंद्र, महिंद्र अँड महिंद्र, एशियन पेंट्स, रिलायन्स इन्फोसिस, एचडीएफसी, टीसीएसही वाढले.

पॉवरग्रिड, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, आयटीसी आदी १.७५ टक्क्य़ांपर्यंत घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान २.१८ टक्क्य़ांपर्यंत वाढले. तर बहुपयोगी, दूरसंचार निर्देशांकांवर गुंतवणूकदारांचा विक्रीदबाव राबिला. मिड कॅप व स्मॉल कॅप प्रत्येकी एक टक्क्य़ापर्यंत वाढले.

निर्देशांकांच्या तेजीला मर्यादा – बँक ऑफ अमेरिका

भारतीय भांडवली बाजारातील तेजीला मर्यादा असून वर्ष २०२१ मध्ये प्रमुख सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक वार्षिक तुलनेत एकेरी अंकवृद्धी नोंदवतील, असा अंदाज बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज या दलालीपेढीने व्यक्त केला आहे.

टाळेबंदीसारख्या करोना प्रतिबंधित निर्बंध घोषणेनंतर तळाला पोहोचलेले निर्देशांक एप्रिल २०२० पासून आता ८० टक्के वर आहेत. डिसेंबर २०२१ पर्यंत निफ्टी १५,००० चा टप्पा पार करेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.