प्रमुख निर्देशांकांची दुसरी मोठी सत्रझेप

सेन्सेक्स, निफ्टी सर्वोच्च शिखरासमीप

६६ कंपन्यांची वार्षिक मूल्य उच्चांकी नोंद

गुंतवणूकदार ५.३३ लाख कोटींनी श्रीमंत

सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यानंतर जाहीर झालेल्या केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या निर्विवाद यशाच्या अंदाजावर उत्साही निर्देशांक प्रतिसाद देताना भांडवली बाजाराने सप्ताहारंभी अनोखा उसळी टप्पा गाठला. एकाच व्यवहारातील जवळपास पावणेचार टक्के निर्देशांक झेप घेत दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या शिखरानजीस विसावले. या रूपाने सेन्सेक्सने मुंबई शेअर बाजाराच्या स्थापनेतील दुसरी मोठी सत्रउसळीची नोंद केली.

सेन्सेक्सने सोमवारी १,४२१.९० अंश झेप घेताना ३९ हजारापुढील, ३९,३५२.६७ ला गाठले. तर ४२१.१० अंश वाढीने निफ्टी ११८२८.२५ वर पोहोचला. मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने गेल्या सहा वर्षांतील तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने दशकातील सर्वोत्तम सत्रझेप नोंदविली आहे.

सेन्सेक्स व निफ्टी यापूर्वी अनुक्रमे ३९,४८८ व ११,८५६ या विक्रमी शिखराला पोहोचले आहेत. मुंबई शेअर बाजारातील ६६ कंपन्यांनी त्यांचे वर्षांतील सर्वोत्तम मूल्य सोमवारी नोंदविले. तर देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती सोमवारच्या मूल्यतेजीने ५.३३ लाख कोटी रुपयांनी झेपावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येण्याचा मतदानोत्तर चाचणीचा कल भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांसाठी खरेदीनिमित्त ठरला. केंद्रात पहिल्यांदाच भाजपप्रणित सरकार सलग दुसऱ्यांदा येत असल्याच्या चाचणीचे स्वागत बाजारात स्वागत झाले.

५४३ जागा असलेल्या लोकसभेत भाजप व मित्रपक्षांना ३०० च्या जवळपास यश मिळण्याबाबतचा कल रविवारी अनेक चाचणीकर्त्यांनी वर्तविला. सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेरच्या, सातव्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर भांडवली बाजार बंद असताना, रविवारी याबाबतचा अंदाज स्पष्ट झाला. त्याची प्रतिक्रिया व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी तेजीद्वारे उमटली.

गेल्या एकूण सप्ताहात सेन्सेक्स ४६७.७८ तर निफ्टी १२८.२५ अंशांनी वाढला आहे. नव्या आठवडय़ाची सुरुवातच तेजीसह करताना सेन्सेक्स जवळपास १,००० अंशांनी तर निफ्टी २०० अंशांनी वाढला होता. व्यवहारात मुंबई निर्देशांक ३९,४१२.५६ तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ११,८३६.३० पर्यंत उंचावला. सेन्सेक्सचा सत्रतळ ३८ हजाराखाली, ३८,५७०.०४ राहिला. तर निफ्टीने सत्राच्या सुरुवातीला ११,६२३.३० हा व्यवहारातील किमान स्तर अनुभवला.

सोमवारच्या मोठय़ा उसळीने भांडवली बाजारात गेल्या काही सत्रांपासून विक्री दबाव असलेल्या बँक, वित्त, वाहन, ऊर्जा क्षेत्रातील समभागांकरिताही मागणी वाढली. तर  सेन्सेक्समधील बजाज ऑटो व इन्फोसिस वगळता इतर समभागांनी मूल्यवाढ नोंदविली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप ३.५७ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

सेन्सेक्समध्ये सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या ३० कंपन्यांचा समावेश आहे. त्यात इंडसइंड बँक, स्टेट बँक, टाटा मोटर्स, येस बँक, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी लिमिटेड, मारुती सुझुकी, ओएनजीसी अस ेकाही समभाग तब्बल ८ टक्क्य़ांपर्यंत वाढले. आशियातील अन्य प्रमुख निर्देशांकांमध्येही सोमवारी वाढ नोंदली गेली.

मुंबई शेअर बाजारातील एकूण समभागांपैकी १,९९८ समभागांचे मूल्य वाढले. तर ६३१ समभागांचे मूल्य घसरले. भांडवली बाजारातील एकूण कंपन्यांच्या समभागांपैकी १८४ समभाग स्थिर राहिले.

रविवारच्या मतदानोत्तर चाचणी कलावर निर्देशांक तेजीची प्रतिक्रिया देणारा भांडवली बाजार आता गुरुवारी, प्रत्यक्ष निवडणूक निकालाच्या दिवशी निर्देशांकांचा कोणता स्तर दाखवितो, याबाबतची उस्तुकता आता शिगेला पोहोचली आहे.

गुंतवणूकदार ५.३३ लाख कोटींनी मालामाल

नव्या सप्ताहातील पहिल्याच सत्रउसळीने मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती एकाच व्यवहारात ५.३३ लाख कोटी रुपयांनी वाढली. देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभागमूल्य सोमवारअखेर ५.३३ लाख कोटी रुपयांनी झेपावत १५१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.

मुंबई शेअर बाजारात सलग तीन व्यवहारात नोंदविले गेलेल्या तेजीमुळे या दरम्यान गुंतवणूकदारांची मालमत्ता एकूण ७.४८ लाख कोटी रुपयांनी उंचावली. यामध्ये अर्थातच सोमवारच्या संपत्तीवाढीचा वाटा मोठा राहिला आहे. सेन्सेक्सने सोमवारी यापूर्वीचा ३९ हजारांचा टप्पाही मागे टाकला.

६६ समभाग वर्षउच्चांकी मूल्यावर

सलग तिसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील ६६ कंपनी समभागांनी सोमवारच्या एकूण वाढीमुळे वर्षभराचा मूल्यउच्चांक गाठला. यामध्ये अधिकतर वित्त, बँक क्षेत्रातील समभागांचा समावेश राहिला. गेल्या काही सत्रांपासून त्यात घसरण नोंदली जात होती.

बजाज फायनान्स, डीसीबी बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसआरएफ, टायटन, कोटक महिंद्र बँक पीव्हीआर आदींनी त्यांचे ५२ आठवडय़ातील सर्वोत्तम समभागमूल्य सप्ताहारंभीच्या व्यवहारात नोंदविले.

भांडवली बाजाराच्या या तेजीच्या कामगिरीतही १५१ समभागांना त्यांच्या वर्षतळाला सामोरे जावे लागले. यामध्ये बायोकॉन, बिनानी इंडस्ट्रिज, ज्युबिलिएंट, मॉन्सेन्टो आदींचा क्रम होता.

रुपयाची द्वैमासिक सत्रझेप

भांडवली बाजारातील निर्देशांकतेजीने येथील परकीय चलन विनिमय मंचावरही सोमवारी उत्साह अनुभवला गेला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सोमवारच्या एकाच व्यवहारात तब्बल ४९ पैशांनी झेपावताना सत्रअखेर ६९.७४ वर स्थिरावले.

केंद्रात विद्यमान सरकार नव्याने विराजमान होण्याबाबतचा चाचणीकल गुंतवणूकदारांच्या पथ्यावर पडला. भांडवली बाजारातली खरेदीमुळे चलनाची आवश्यकता भासल्याने रुपयाने सोमवारच्या व्यवहारात गेल्या दोन महिन्यातील सर्वोत्तम पैसेउसळी नोंदविली. ७०.३६ या स्तरावर परकीय चलन मंचावर रुपयाच्या डॉलरसमोरील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर स्थानिक चलन सत्रात ६९.४४ पर्यंत झेपावले. दिवसअखेर त्यात गेल्या सप्ताहअखेरच्या तुलनेत ०.७० टक्के भर पडली.

रुपया शुक्रवारी ७०.२३ वर होता. सोमवारच्या रूपात रुपयाने १८ मार्चनंतरची सर्वात मोठी सत्रझेप नोंदविली. यापूर्वी स्थानिक चलनाची एकाच व्यवहारातील वाढ ५७ पैशांची होती.

तेलदरवाढीकडे गुंतवणूकदारांचे दुर्लक्ष

येथील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत ७० पर्यंत रुपयांचे मूल्य उंचावण्याचीही दखल बाजाराने घेतली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतीने प्रति पिंप ७३ डॉलरची ओलांडलेल्या वेसकडेही गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात खरेदीचे व्यवहार करताना दुर्लक्ष केले.

काळ्या सोन्याच्या किंमती सोमवारी पिंपामागे १.४० टक्क्य़ांनी वाढत ७३.२२ डॉलरपुढे गेले. तर अमेरिकेतील खनिज तेलाच्या किंमतीही आता प्रति पिंप ६३ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत.