मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २०१५च्या सुरुवातीला सर्वोच्च टप्प्यावर विराजमान होण्यापूर्वीच प्रमुख निर्देशांकातील विदेशी संस्था गुंतवणूक ऐतिहासिक उच्चांकापर्यंत नोंदली गेली आहे. बाजारातील एकूण बाजार भांडवलाच्या तुलनेत हे प्रमाण थेट २३ टक्के आहे.
‘बँक ऑफ अमेरिका मेरिल लिन्च’च्या अहवालानुसार, मार्च २००९ मध्ये विदेशी संस्था गुंतवणूक ही एकूण बाजार भांडवलाच्या तुलनेत १५ टक्के होती. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ मध्ये मात्र ती केंद्रात सत्तेत आलेल्या स्थिर सरकारद्वारे राबविले जाणाऱ्या आर्थिक सुधारणांच्या जोरावर कमालीची उंचावली आहे.
२०१४-१५च्या तिसऱ्या तिमाहीत सेन्सेक्समधील विदेशी संस्था गुंतवणूक ही २ अब्ज डॉलरहून अधिक झाली आहे. सलग नवव्या तिमाहीत ती उंचावली आहे. विदेशी संस्था गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील वाढता विश्वास व त्याचे सेन्सेक्समधील निधीच्या ओघातील रूपांतर हे गेल्या पाच वर्षांतील कमालीचे वाढते राहिले आहे.
स्थानिक म्युच्युअल फंडातील विदेशी संस्था गुंतवणुकीचा ओघ प्रामुख्याने एप्रिल-मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर वाढल्याचे दिसून येते, असे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेचे ज्योतिवर्धन जयपुरिया यांनी म्हटले आहे. तिसऱ्या तिमाहीत विदेशी संस्था गुंतवणूकदारांची भूमिका ही समभाग खरेदीदारांची राहिल्याचेही ते म्हणाले.
सेन्सेक्समध्येही बँक समभागांमध्ये विदेशी संस्था गुंतवणूकदारांचा कल अधिक राहिल्याचेही ‘बँक ऑफ अमेरिका मेरिल लिन्च’ने म्हटले आहे. यामध्ये स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँकेचा समावेश राहिला आहे. स्टेट बँकेबरोबरच बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाही या गुंतवणूकदारांची पसंती राहिली आहे.

सेन्सेक्स पुन्हा २९ हजारावर विराजमान
मुंबई: किरकोळ निर्देशांक वाढीसह सेन्सेक्स मंगळवारी पुन्हा २९ हजारावर पोहोचण्यात यशस्वी ठरला. गेल्या दोन व्यवहारातील घसरण मोडून काढतानाच मुंबई निर्देशांक पुन्हा एकदा वाढीवर स्वार झाला. २९.५५ अंश वाढीसह सेन्सेक्स २९,००४.६६ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७.१५ अंश वाढ राखत ८,७६२.१० पर्यंत गेला. सत्रातील त्याचा ८,८०० वरील प्रवास मात्र तेजीनंतरही दिवसअखेर कायम राहिला नाही.
सेन्सेक्स गेल्या दोन सत्रांतील ४८७.१६ अंश घसरणीपूर्वी सलग सात व्यवहारात तेजी नोंदवीत होता. तर सोमवारच्या घसरणीने सेन्सेक्सने २९ हजाराचा स्तरही सोडला होता. निफ्टीनेही या वेळी ८,८०० ची पातळी सोडली. मंगळवारी निवडक समभागांमध्ये खरेदी नोंदवीत गुंतवणूकदारांनी नफ्यासाठी आपला कल नोंदविला. चालू महिन्यातील वायदापूर्तीची अखेर येत्या गुरुवारी होत आहे. तर शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर बाजारात मंगळवारी भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता, पायाभूत व आरोग्यनिगा क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचे वातावरण नोंदले गेले. तर तेल व वायू निर्देशांकावरील दबाव हा एकूण निर्देशांक वाढीतही कायम राहिला. सेन्सेक्समध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर ३.१५ टक्क्यांच्या वाढीसह सर्वात आघाडीवर राहिला. तर आयटीसी, लार्सन, भेल, सिप्ला, गेल, मारुती सुझुकी, विप्रो, अ‍ॅक्सिस बँक यांनी तेजी नोंदविली.