५५४ अंशांच्या घसरगुंडीने ‘सेन्सेक्स’ २५ हजारांखाली, १९ महिन्यांतील निचांक
जागतिक भांडवली बाजाराला हादरे देणाऱ्या चिनी धक्क्याची पुनरावृत्ती तीन दिवसांनी पुन्हा अनुभवास आली. चीनमधील चलन अवमूल्यनाच्या अनर्थाचे आघात म्हणून तेथील शेअर बाजाराचा शांघाय कम्पोझिट निर्देशांक गुरुवारी पुन्हा ७.३८ टक्क्यांनी गडगडला आणि अवघ्या अध्र्या तासात तेथील व्यवहार दिवसभरासाठी गुंडाळावे लागले. भारतासह जगभरच्या बाजारात त्याचे भयानक पडसाद उमटले. सेन्सेक्स ५५५ अंशांनी गडगडून २५ हजारांखाली म्हणजे १९ महिन्यांपूर्वीच्या तळात जाऊन विसावला.
चिनी बाजारातील व्यवहार दिवसभरासाठी स्थगित केले गेल्यानंतर, भारतीय प्रमाणवेळेनुसार काही तासांनी सुरू झालेल्या स्थानिक बाजारातील व्यवहार मोठय़ा घसरणीनेच सुरू झाले. सलग तीन दिवसांच्या घसरणीला पुढे लांबवत नेत गुरुवारी आणखी ३७८ अंशाच्या (१.४८ टक्के) तुटीसह सेन्सेक्सची सुरुवात झाली. चीनमधील विपरीत घडामोडींसह अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या आपटीमुळे एकूण गुंतवणूकदारांच्या मनातील भीतीत आणखी भर घातली.
आशियाई देशांतील प्रमुख बाजारांसह, दुपारनंतर सुरू झालेल्या युरोपीय बाजारांतही प्रारंभिक व्यवहार तीव्र स्वरूपाच्या घसरणीने सुरू झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्सने तोवर २५ हजारांची पातळीही तोडली आणि २४,८२५.७० म्हणजे बुधवारच्या तुलनेत ५८० खाली घरंगळला. दिवसअखेर थोडे वर डोके काढून सेन्सेक्स ५५४.५० अंश (२.१८ टक्के) गमावून २४,८५१.८३ वर येऊन थांबला. गेल्या सलग चार सत्रांत सुरू राहिलेल्या घसरणीत सेन्सेक्सने १,३०९ अंशांनी अथवा ५.१ टक्क्यांनी घरंगळला आहे. सेन्सेक्सच्या तुलनेत व्यापक परिमाण असलेल्या निफ्टी निर्देशांकही १७२.७० अंश (२.२५ टक्के) गमावून ७,५६८.३० वर स्थिरावला.
उल्लेखनीय बाब म्हणजे सोमवारच्या चिनी पडसादापायी झालेल्या घसरणीने आघाडीच्या निर्देशांकाच्या आपटीनेही बाजारात एकूण वधारलेल्या समभागांच्या संख्येचे पारडे जड होते. गुरुवारच्या घसरणीत सेन्सेक्स-निफ्टीच्या तुलनेत मिडकॅप व स्मॉल कॅप व अन्य प्रातिनिधिक निर्देशांकांमधील घसरणीची मात्रा मोठी होती. परिणामी २,१९८ घसरणाऱ्या समभागांच्या तुलनेत वाढ दर्शविलेल्या समभागांची संख्या अवघी ६८० इतकीच होती.
उत्पात नेमकाकाय?
* चीनमधील घडामोडींनी आठवडय़ात दुसऱ्यांदा जागतिक भांडवली बाजाराला हादरे दिले. चीनमधील नेमक्या उत्पाताचे हे विश्लेषण..
* चीनच्या मध्यवर्ती बँकेने त्या देशाचे चलन युआनचे मध्यवर्ती मूल्य हे बुधवारच्या बंद पातळीच्या तुलनेत ०.५१ टक्क्यांनी कमी करून ते प्रति अमेरिकी डॉलर ६.५६४६ असे निश्चित करणारा गुरुवारी निर्णय घेतला.
* गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केल्या गेलेल्या युआनच्या आश्चर्यकारक ५ टक्के अवमूल्यनानंतरचे हे सर्वात मोठे अवमूल्यन ठरले.
* उलट हे अवमूल्यन नसून चलनाला बाजार निर्धारित मूल्य प्रदान करण्याचे पाऊल असल्याचा सरकारचा दावा आहे.
* प्रमुख विदेशी चलनांच्या तुलनेत युआनच्या घसरणीला बांध घालण्याची चिनी मध्यवर्ती बँकेची भूमिका संपुष्टात आणून चलनाच्या मुक्त घसरणीला खुला वाव दिला गेला आहे.
* प्रत्यक्षात ढासळत्या निर्यातीला चालना देण्याचा हा चीनच्या सरकारचा जाणूनबुजून प्रयत्न म्हणूनच याकडे पाहिले पाहिजे.
* देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भक्कमतेबाबत साशंकता निर्माण करणाऱ्या या पावलाचे चिनी बाजारात आठवडय़ात दुसऱ्यांदा ‘सर्किट ब्रेकर’ लागून व्यवहार बंद पडतील इतक्या घसरणीचे तीव्र पडसाद उमटले.
* बाजारात गुंतलेल्या विदेशी मत्तेच्या पलायनाने प्रत्यक्षात युआनमध्ये डॉलरच्या तुलनेत आणखी तीव्र घसरण दिसून आली.
आपण काळजी
का करावी?
* युआनच्या अवमूल्यनाचा दुसरा परिणाम म्हणजे जागतिक व्यापाराचे प्रमुख चलन असलेल्या डॉलरला आपोआपच बळकटी मिळेल.
* जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता असलेल्या चीनशी अनेक देशांशी असलेले व्यापार संबंध बाधित होण्याबरोबरच, डॉलरच्या बळकटीचे विपरीत परिणाम सबंध जागतिक व्यापारावर दिसतील.
* चीनशी व्यापार फायदेशीर ठरावा म्हणून साहजिकच अनेक देशांना विशेषत: आशियाई देशांना त्यांच्या चलनाचे अवमूल्यन करणे भाग ठरेल.
* गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये असे घडताना दिसून आले आहे.
* या चलन अवमूल्यन चढाओढीत जगभरातील अनेक उभरत्या अर्थव्यवस्था ओढल्या जात आहेत. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण करणारे विचलन दिसून येईल.
* खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील गुरुवारच्या २ टक्क्यांच्या घसरणीने त्याची चुणूक दिली आहे.
* सोन्याला अकस्मात आलेले मोल हेही अस्थिरता सूचक आहे.