01 March 2021

News Flash

सेन्सेक्समध्ये ४७० अंश आपटी

दोन्ही प्रमुख निर्देशांकांत जवळपास एक टक्क्यापर्यंत घसरण झाली.

(संग्रहित छायाचित्र)

सलग दुसऱ्या व्यवहारातील मोठय़ा निर्देशांक घसरणीने भांडवली बाजार सप्ताहारंभीच त्यांच्या अनोख्या टप्प्यापासून पुन्हा माघारी फिरले. दोन्ही प्रमुख निर्देशांकांत जवळपास एक टक्क्यापर्यंत घसरण झाली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारच्या ४७०.४० अंश घसरणीने ४८,५६४.२७ पर्यंत येऊन ठेपला, तर १५२.४० अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४,२८१.३० वर स्थिरावला.

गेल्या दोन व्यवहारांतील मोठय़ा घसरणीने मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये १,००० हून अधिक अंशांची घसरण झाली आहे. गेल्या सप्ताहाची अखेर करताना मुंबई निर्देशांक ५०० हून अधिक अंश आपटीमुळे त्याच्या ४९,५०० च्या टप्प्यापासून दूर जात ४९ हजारांवर येऊन ठेपला होता, तर नव्या सप्ताहारंभीच्या पहिल्याच व्यवहारातही जवळपास तेवढीच निर्देशांक घसरण मुंबई शेअर बाजारात झाली. परिणामी सेन्सेक्स आता ४८,५०० च्याही खाली आला आहे.

भांडवली बाजारात गुंतवणूकदारांच्या नफेखोरीचे सत्र सोमवारीही कायम राहिले. त्याचबरोबर जागतिक बाजारातील घसरणीचीही येथील निर्देशांकांना साथ मिळाली. डॉलरच्या तुलनेत घसरलेले रुपयाचे मूल्य, आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या वाढत्या किमती यांचाही विपरीत परिणाम येथील बाजारात सोमवारी झाला.

सेन्सेक्समध्ये सार्वजनिक तेल उत्पादन क्षेत्रातील ओएनजीसी सर्वाधिक ५ टक्क्यांसह घसरला. तसेच सन फार्मा, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, बजाज फायनान्स, बजाज फिनसव्‍‌र्ह, स्टेट बँक, एनटीपीसीही घसरले. मुंबई निर्देशांकातील ३० पैकी केवळ रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन कंपनी, एचडीएफसी बँक, आयटीसीचे मूल्य वाढू शकले. पोलाद, दूरसंचार, आरोग्यनिगा, वाहन क्षेत्रीय निर्देशांक ४ टक्क्यांपर्यंत घसरले, तर ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा निर्देशांक वाढले.

रुपया आठवडय़ाच्या तळात

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सोमवारी त्याच्या गेल्या सप्ताहाच्या तळात विसावले. परकीय चलन विनिमय मंचावर आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात स्थानिक चलन थेट २१ पैशांनी खाली आले. परिणामी रुपयाला सत्रअखेर ७३.२८ वर विराम घ्यावा लागला. ७३.२१ या टप्प्यावर व्यवहार सुरू झालेल्या रुपयाचा सत्रा दरम्यान ७३.३० पर्यंतचा उतरता प्रवास राहिला. व्यवहारात ७३.१८ पर्यंतच रुपया मजल मारू शकला. सोमवारअखेर बंद झालेला रुपयाचा स्तर ११ जानेवारीनंतरचा किमान राहिला.

नझाराची लवकरच भागविक्री

मनोरंजन-खेळ तंत्रज्ञान पुरविणाऱ्या आघाडीच्या नझारा टेक्नॉलॉजिजचे प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेकरिता भांडवली बाजार नियामक सेबीकडे अर्ज सादर केला आहे. प्रसिद्ध गुंतवणूकगुरू राकेश झुनझुनवाला यांचे अर्थ-हिस्सा पाठबळ लाभलेल्या नझारा टेक्नॉलॉजिज ४९.६५ लाख समभाग भांडवली बाजारात उपलब्ध करून निधी उभा करणार आहे. कंपनीने यापूर्वी, फेब्रुवारी २०१८ मध्येही ही प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.

आयआरएफसीसाठी किरकोळ गुंतवणूकदारांचा पूर्ण भरणा

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेला पहिल्याच दिवशी किरकोळ गुंतवणूकदारांनी लक्षणीय प्रतिसाद दिला. प्रति समभाग २५ ते २६ रुपयेप्रमाणे एका टप्प्यात ५७५ समभागांसाठी नोंदणी करता येऊ शकणाऱ्या किरकोळ तसेच कर्मचाऱ्यांसाठी राखीव समभागांकरिता पूर्ण क्षमतेने भरणा झाला. ४,६०० कोटी रुपयांच्या एकूण प्रक्रियेला ६५ टक्के प्रतिसाद मिळाला.

इंडिगो पेंट्सची बुधवारपासून विक्री

देशातील पहिल्या पाच रंगनिर्मात्या कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या इंडिगो पेंट्सच्या प्रारंभिक खुल्या भागविक्रीकरिता बुधवारी, २० जानेवारीला प्रारंभ होत आहे. २२ जानेवारीला बंद होणाऱ्या या प्रक्रियेच्या माध्यमातून कंपनी ५८.४० लाख समभाग विक्रीद्वारे ३०० कोटी रुपये उभे करणार आहे. प्रति समभाग १,४८८ ते १,४९० रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या रूपात चालू, २०२१ वर्षांतील दुसरी हिस्सा विक्री प्रक्रिया भांडवली बाजारात पार पडत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 12:11 am

Web Title: sensex plunges 470 points abn 97
Next Stories
1 ‘डीएचएफएल’साठी पिरामल समूहाची बोली मंजूर
2 अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला
3 नफेखोरीने घसरण
Just Now!
X