भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक – सेन्सेक्स व निफ्टीमध्ये मंगळवारी प्रत्येक दीड टक्क्यांहून आणि सलग चौथी वाढ नोंदविली गेली. भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील यशस्वी वाटाघाटीनंतर सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने झालेल्या सहमतीने बाजारावर दिसून आलेला हा परिणाम आहे.

मंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्स ५१९.११ अंशांनी उसळून ३५,४३०.४३ पातळीवर दिवसअखेर स्थिरावला, तर निफ्टी निर्देशांक सोमवारच्या तुलनेत १५९.८० अंशांची भर घालून १०,४७१ वर पोहोचला. सेन्सेक्समध्ये लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो ७ टक्क्यांच्या मुसंडी सर्वाधिक वाढ नोंदविणारा समभाग ठरला, त्या खालोखाल बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एनटीपीसी, पॉवरग्रिड, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र  आणि अ‍ॅक्सिस बँक यांनी वाढ साधली. सलगपणे तेजी साधणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज त्याचप्रमाणे भारती एअरटेल आणि मारुती हे समभाग घसरणीत राहिले.

जागतिक स्तरावरही निरंतर रोकडतरलतेने भांडवली बाजारातील सकारात्मकता स्थानिक बाजारासाठी उपकारक ठरली. प्रमुख आशियाई आणि युरोपातील भांडवली बाजारात मंगळवारी तेजीपूरक सकारात्मक वातावरण होते. बाजारातील खरेदीच्या परिणामी भारतीय चलन रुपयाचे विनिमय मूल्यही प्रति डॉलर ३७ पैशांनी वधारून ७५.६६ पातळीवर आले.

माहिती-तंत्रज्ञान समभाग घसरणीतून सावरले

अमेरिकेने एच १ बी हा व्हिसा वर्षअखेरीपर्यंत स्थगित केल्याने आता भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना मोठा फटका बसणार असून, त्याचे सावट मंगळवारच्या बाजारातील प्रारंभिक व्यवहारांवरही पडलेले दिसून आले. टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज हे समभाग मंगळवारी बाजार खुला होताच दणक्यात आपटले. टीसीएस सर्वाधिक ११.१५ टक्क्यांनी गडगडला. पुढे घसरणीतून सावरून तो ०.३६ टक्के वाढीसह २,०३५.३० वर बंद झाला. त्याप्रमाणे विप्रो (+१.२२ टक्के) २२०.६५, इन्फोसिस (+२.३९ टक्के) ७२०.४५ आणि एचसीएल टेक (+ १.५८ टक्के) ५७८.५५ रुपये या पातळीवर बंद झाला.