सलग घसरणीनंतर ‘सेन्सेक्स’ची ६४० अंशांनी मुसंडी

मुंबई : सलग तीन सत्रांतील घसरण मोडून काढताना भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक गुरुवारी पुन्हा विक्रमी उच्चांकाच्या दिशेने आगेकूच दमदारपणे सुरू करताना दिसून आले. बँक, वित्त क्षेत्रातील समभागांनी खरेदीची साथ मिळाल्याने सेन्सेक्स व निफ्टीत मंगळवारच्या तुलनेत जवळपास सव्वा टक्क्यांची भर पडली.

ईदनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने बुधवारी भांडवली बाजारात व्यवहार झाले नाहीत. गुरुवारच्या व्यवहारात मात्र सेन्सेक्स ६३९.७० अंश झेपेसह ५२,८३७.२१ पर्यंत उंचावला. तर निफ्टी १९१.९५ अंश वाढीसह १५,८२४.०५ वर जाऊन पोहोचला. जागतिक बाजारामुळे माहिती तंत्रज्ञान समभागांनी तेजीला सहकार्य केले.

भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक १६ जुलै रोजी संपलेल्या आठवडय़ात विक्रमी टप्प्यावर विराजमान होते. त्यानंतरच्या सलग तीन सत्रात त्यात घसरण नोंदली गेली. या दरम्यान मुंबई निर्देशांक ९६०.३४ अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २९१.८० अंशांनी खाली आला.

भांडवली बाजारात कंपन्यांची प्रारंभिक खुल्या भागविक्रीकरिता रांग लागली असताना गुंतवणूकदारांकडून डॉलरच्या तुलनेत रुपयाची मागणी जोर धरू लागली आहे. परिणामी बाजारात समभाग खरेदीसाठी गुंतवणूकदारांमध्ये उत्साही वातावरण आहे. त्याला आशियातील अन्य देशांतील, पाश्चिमात्य देशांतील निर्देशांक तेजीची जोडही आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आणि महिंद्र समूहातील टेक महिंद्र गुरुवारी सेन्सेक्समध्ये ५.६५ टक्के वाढीसह अव्वल राहिला. तसेच बजाज फायनान्स, भारती एअरटेल, बजाज फिनसव्‍‌र्ह, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँकही काही प्रमाणात वाढले.

जवळपास १.२० टक्क्यांहून अधिकच्या सेन्सेक्सच्या तेजीतही हिंदुस्थान यूनिलिव्हर, एशियन पेंट्स, बजाज ऑटो, महिंद्र अँड महिंद्र हे समभाग मात्र १.७३ टक्क्यापर्यंत घसरले. मुंबई निर्देशांकांमधील प्रमुख ३० पैकी २६ समभागांचे मूल्य वाढीच्या यादीत राहिले. निवडक कंपन्यांच्या तिमाही निकालाचेही बाजारात स्वागत झाले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, दूरसंचार, भांडवली वस्तू, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर उपभोग्य वस्तू निर्देशांक दिड टक्क्यापर्यंत घसरला. किरकोळ गुंतवणूकदारांच्या पसंतीचे मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक १.५२ टक्क्यांपर्यंत वाढले.