चालू आर्थिक वर्षांतील व्यवहाराचा शेवट शतकी अंश वाढीने करणारा मुंबई शेअर बाजार सप्ताहाच्या उच्चांकाला पोहोचला. १३१.२४ अंश वाढीने ‘सेन्सेक्स’ १८,८३५.७७ या टप्प्यापर्यंत पोहोचताना २०१२-१३ ची अखेर तेजीसह नोंदविता झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ देखील ४०.९५ अंश वाढीने ५,६८२.५५ वर बंद झाला.
गुरुवारच्या वायदेपूर्तीच्या सप्ताहासमवेतच भांडवली बाजारातील चालू आर्थिक व्यवहाराचा शेवटचा दिवस होता. बाजाराने सत्राची सावध सुरुवात करताना लगेचच पहिल्या तासातच गेल्या चार महिन्यातील तळ गाठला. मात्र उत्तरार्धात तो वधारत दिवसाच्या १८८०० च्या पुढच्या उच्चांकापर्यंत गेला. १८८८५ पर्यंत पोहोचताना बाजाराने २० मार्चनंतरचा सर्वात मोठा पल्ला गाठला होता.
चालू आठवडय़ात मंगळवार आणि शुक्रवारी बाजाराने तेजी नोंदविली.
बँक क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक यांच्या समभागांना गुरुवारी मागणी राहिली. तर आयटीसी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, ओएनजीसी, टीसीएस, गेल, कोल इंडिया यासारखे समभागांचे मूल्यही वधारले. पोलाद क्षेत्रातील समभागही दोन ते चार टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदवित होते.