सत्राच्या प्रारंभी ४०० अंशांची मुसंडी मारणाऱ्या सेन्सेक्सचा उत्तरार्धात, विशेषत: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषद घेऊन केलेल्या घोषणा पाहून नूर पालटला. तरी भांडवली बाजाराच्या निर्देशांकाने सोमवारी सलग आठव्या सत्रात विजयी दौड कायम ठेवली.

सेन्सेक्सने शुक्रवारच्या तुलनेत ८४.३१ अंशांची वाढ नोंदवून ४०,५९३.८० या पातळीवर सोमवारी व्यवहार थंडावले तेव्हा विश्राम घेतला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकही १६.७५ अंश वाढीसह ११,९३०.९५ या पातळीवर पोहोचला. दोन्ही निर्देशांकांनी साधलेली ही सलग आठव्या सत्रातील वाढ आहे.

ग्राहकांच्या मागणीत वाढ होऊन बाजारपेठांना आगामी उत्सवपर्वात बहर येईल आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या हाती प्रवास भत्ता आणि उत्सव काळाचा अग्रिम म्हणून १०,००० रुपये रोख देण्याची घोषणा केली. शिवाय, करोना कहरामुळे ताळेबंद बिघडलेल्या राज्यांच्या अर्थव्यवस्थांसाठी उपकारक ठरेल, अशा त्यांनी घोषणा केल्या. तथापि, प्रत्यक्ष टाळेबंदीने बेजार उद्योगधंद्यांसाठी कोणतेही प्रोत्साहन नसल्याने अर्थमंत्र्यांच्या घोषणांचे स्वागत होण्याऐवजी, प्रत्यक्षात बाजारात त्यानंतर सुरू झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांची निराशाच केल्याचे दिसून आले.