सेन्सेक्स २६ हजार तर निफ्टी ७,९०० वर
रिझव्‍‌र्ह बँकेच्या कंपन्यांच्या चिंतेनंतरही झेप
२०१५ ची अखेर अंतिम टप्प्यात असताना भांडवली बाजार नव्या सप्ताहारंभी अनोख्या टप्प्यावर विराजमान झाला. सोमवारच्या एकाच व्यवहारातील जवळपास द्विशतकी निर्देशांक वाढीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स महिन्याच्या वरच्या स्थानावर झेपावला. यामुळे २६ हजारापुढील प्रवास त्याला गाठता आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सहजच ७,९०० पार झाला. निफ्टीचा हा स्तर मात्र गेल्या जवळपास महिन्यातील सर्वोच्च ठरला.
आंतरराष्ट्रीय बाजारात संमिश्र वातावरण असताना येथे मात्र २०१५ ची अखेर तेजीसह करण्याचेच गुंतवणूकदारांनी मनावर घेतले. परिणामी वर्षांच्या शेवटच्या आठवडय़ाची सुरुवात करताना सेन्सेक्स व्यवहारातच २६ हजारानजीक झेपावला होता.
मधल्या व्यवहारात रिझव्‍‌र्ह बँकेच्या कंपन्यांच्या तिमाही ताळेबंदाबाबत व्यक्त केलेल्या चिंतेची छाया बाजारावर उमटली. दिवसअखेर मात्र त्यात गेल्या गुरुवारच्या तुलनेत वाढच नोंदली गेली. शुक्रवारी ख्रिममसनिमित्त बाजारातील व्यवहार बंद होते. २६ हजारापुढील सेन्सेक्सचा यापूर्वीचा टप्पा महिन्याच्या सुरुवातीला, २ डिसेंबर रोजी होता. तर निफ्टी सोमवारच्या सत्रात ७,९३७.२० पर्यंत पोहोचला होता. चालू महिन्यातील वायदापूर्तीची अखेरही ३१ डिसेंबर या शेवटच्या दिवशीच होणार आहे.
परकी चलन व्यासपीठावर डॉलरच्या तुलनेत भक्कम होत असलेल्या रुपयाचेही स्वागत बाजारात गुंतवणूकदारांनी सोमवारचे व्यवहार करताना केले. स्थानिक चलनाची ही गेल्या सलग आठव्या सत्रातील तेजी होती. यापूर्वी रुपया ६७ पर्यंत घसरला आहे. बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा दिसून येत आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये डॉ. रेड्डीज, एनटीपीसी, टाटा मोटर्स, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रिज, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, ल्युपिन, अदानी पोर्ट्स, सिप्ला, मारुती सुझुकी यांचे समभाग तेजीत राहिले. सेन्सेक्समधील २२ समभागांचे मूल्य वाढले. तर मध्यल्या व्यवहारातील घसरणीमुळे टाटा स्टील, भारती एअरटेल, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, एचडीएफसी, भेल, गेल, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो यांचे समभाग मूल्य दिवसअखेरही कमीच नोंदले गेले.
मुंबई शेअर बाजारात क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा निर्देशांक हा सर्वाधिक, १.३४ टक्क्य़ांसह वाढला. तसेच वाहन, ऊर्जा, बँक, तेल व वायू निर्देशांकातही वाढ राखली गेली. स्मॉल व मिड कॅप निर्देशांक मात्र ०.५० टक्क्य़ांपुढे जाऊ शकले नाही.