सेन्सेक्समध्ये ३३३ अंश झेप; निफ्टीकडून ७,७०० सर
नव्या आठवडय़ाची सुरुवातच लक्षणीय तेजीसह करताना भांडवली बाजारांचे प्रमुख निर्देशांक सोमवारी त्यांच्या अनोख्या टप्प्यावर पोहोचले. ३३२.६३ अंश वाढीसह सेनसेक्स २५ हजार पार होत २५,२८५.३७ पर्यंत झेपावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत एकाच व्यवहारात ९९.९० अंश वाढ नोंदली गेल्याने निर्देशांक ७,७०० पल्याड, ७,७०४.२५ वर गेला.
सेन्सेक्स आता गेल्या तब्बल ११ सप्ताहाच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यापूर्वीचा त्याचा वरचा टप्पा ६ जानेवारी २०१६ रोजी होता.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी बाजारात गुंतवणूकदारांच्या उत्साहाची भर पडली. आशियाई बाजारातील तेजीच्या जोरावर येथे रिझव्‍‌र्ह बँकेकडून संभाव्य व्याजदर कपातीच्या आशेने चैतन्य निर्माण झाले. विदेशी गुंतवणूकदारांनीही बाजारात पुन्हा एकदा मोठे पाऊल टाकले.
सोमवारच्या सुरुवातीच्या व्यवहारातच २५ हजारा पल्याड जाताना मुंबई निर्देशांक सत्रात २५,३२७.४५ पर्यंत उंचावला. दिवसअखेर त्यात शुक्रवारच्या तुलनेत १.३३ टक्क्य़ांची वाढ झाली. तर सत्रात ७,७०० च्या पुढे जाणाऱ्या निफ्टीतही सत्रअखेर १.३१ टक्क्य़ांची झेप नोंदली गेली.
भांडवली बाजारात पुन्हा विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी पाऊल ठेवल्याने शुक्रवारी सेन्सेक्स २७५.३७ अंशांनी उंचावला होता. तर त्यांचे हे पाऊल सोमवारी अधिक भक्कम होत निर्देशांकात त्रिशतकी वाढ नोंदली गेली. सप्ताहारंभीची आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांकाची तेजीही येथे भर नोंदविण्यास कारणीभूत ठरली.
सेन्सेक्समधील हिंदुस्थान यूनिलिव्हर, स्टेट बँक, सन फार्मा, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, टाटा मोटर्स, विप्रो, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, भारती एअरटेल, आयटीसी, एचडीएफसी बँक, सिप्ला, ओएनजीसी, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग मूल्य वाढले.
मुंबई शेअर बाजारात भांडवली वस्तू क्षेत्रीय निर्देशांक सर्वाधिक २ टक्क्य़ांसह उंचावला होता. तर ग्राहकपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता, बँक, वाहन, तेल व वायू क्षेत्रातील निर्देशांकांनाही भाव मिळाला.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक १.३६ टक्क्य़ांपर्यंत वाढले होते.
फेडरल रिझव्‍‌र्हच्या स्थिर व्याजदर पतधोरणावर आशियाई बाजाराने निर्देशांक वाढीची प्रतिक्रिया दिलेली आपण पाहिली. येथे, भारतातही जवळपास तसेच वातावरण आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण लवकरच जाहीर होत आहे. तेव्हा व्याजदर कपातीबाबत अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. त्याचेच पडसाद बाजारात उमटत आहेत.
– श्रेयस देवळकर, निधी व्यवस्थापक (समभाग), बीएनपी पारिबास म्युच्युअल फंड.