पावसाचा वाढत जोर हा भांडवली बाजारात निर्देशांकांत तेजीच्या सरी निर्माण करणारा ठरत आहे. सोमवारी सलग सातव्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक- सेन्सेक्सने ४१४ अंशांची भर घालून, २७,७३०.२१ची पातळी गाठली.
पावसाचा प्रारंभिक जोर पाहता तुटीच्या मान्सूनच्या पूर्वभाकीतांनी निर्माण केलेल्या भीतीला मागे टाकले असून, परिणामी व्याज दर कपातीबाबत निर्माण झालेल्या अनुकूलतेने बाजारात यासंबंधाने संवदेनशील स्थावर मालमत्ता, बँका आणि वाहन कंपन्यांच्या समभागांनी मोठी मागणी दिसून आली. ग्रीसने धनको संस्थांना दिलेल्या नवीन प्रस्तावाने या प्रश्नावर गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेली कोंडी फुटण्याची निर्माण झालेल्या शक्यतेने जगभरातील प्रमुख शेअर बाजारातील सकारात्मकतेने स्थानिक बाजारातील ताज्या वर्षां-उत्साहात सोमवारी भर घातली.
गेल्या सात दिवस अव्याहत सुरू राहिलेली खरेदीची बरसात, तेजीच्या सरींपायी सेन्सेक्सने एकूण १,३५९.२३ अंशांची कमाई केली आहे. सरलेल्या फेब्रुवारीतील सलग दौडीनंतरची सेन्सेक्सची ही सर्वात मोठी तेजीमालिका आहे. दरम्यान, निफ्टी निर्देशांकाने तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाची ८,३५० ची पातळी पुन्हा कमावली आहे.
बाजारात हा नवोन्मेष कशाने?
ग्रीसचे युरोपीय राष्ट्राचा संघ – युरोझोनमधून फुटून बाहेर पडण्याच्या शक्यता मावळत असल्याने जागतिक स्तरावर प्रमुख बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचेही विधायक पडसाद आपल्या बाजारात उमटताना दिसले. तर पाऊस सरासरीपेक्षा चांगला होताना पाहून रिझव्‍‌र्ह बँकेकडून येत्या काळात आणखी व्याजदर कपात केली जाईल, अशा आशा गुंतवणूकदारांमध्ये उंचावल्या आहेत.
बँकांचा भाव वधारला..
सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात सोमवारी वधारणाऱ्या समभागांमध्ये बँकांचेच समभाग आघाडीवर होते. तर क्षेत्रीय निर्देशांकामध्ये बँक निफ्टीने आघाडी उघडल्याचे दिसून आले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या २ जूनच्या पतधोरण आढाव्यानंतरच्या आठवडय़ात झालेल्या बाजारातील पडझडीत बँकांच्या समभागांच्या घसरणीचे मोठे योगदान राहिले होते. ते चित्र आता पूर्णपणे पालटताना दिसत आहे. खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस (३.६२ टक्के) आणि आयसीआयसीआय (३.४६ टक्के) या मुसंडीत आघाडीवर राहिल्या. एचडीएफसी (२.५०टक्के), स्टेट बँक (२.१९ टक्के), एचडीएफसी बँक (१.७७ टक्के) यांचेही मोठे योगदान राहिले. बीएसई बँकेक्स निर्देशांक २.६२ टक्क्यांनी वधारला.