निफ्टीने ७,९५० चा गड राखला
सेन्सेक्स व निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये सलग तिसऱ्या व्यवहार तेजीचा राहिला. व्याजदर कपातीचे स्वागत आणि जागतिक बाजारातील सकारात्मकता या जोरावर सेन्सेक्स  गुरुवारी ६६.१२ अंश वाढीसह २६,२२०.९५ वर पोहोचला, तर अवघ्या २ टक्के वाढीसह निफ्टीने ७,९५०चा गड कायम राखला.
बाजारात गुरुवारीही व्याजदराशी निगडित बँक, वाहन, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. डॉलरच्या तुलनेत भक्कम होत असलेल्या रुपयातील मजबूतीही बाजारभावना उंचावण्यास कारणीभूत ठरली. माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण कंपन्यांवर मात्र दबाव राहिला.
सेन्सेक्सने चालू आठवडय़ाची सुरुवात ३०० अंशांच्या घसरणीने करत मुंबई निर्देशांकाला २६ हजारावर आणून ठेवले होते.  मात्र गेल्या सलग तीन व्यवहारातील निर्देशांक वाढीमुळे सेन्सेक्सला गुरुवारअखेर २६,२०० पुढील प्रवास नोंदविता आला. या कालावधीत सेन्सेक्समध्ये ६०५ अंशाची भर पडली.
मुंबई निर्देशांक महिन्यापूर्वी, ३१ ऑगस्ट रोजी २६,२८३.०९ या वरच्या टप्प्यावर होता, तर साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये १.३८ व निफ्टीत १.०४ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
शुक्रवारी गांधी जयंतीनिमित्त बाजारात व्यवहार होणार नाहीत.