व्याजदर कपातीच्या आशेने निफ्टी ७,२०० पुढे; भक्कम डॉलरच्या साथीने गुंतवणूकदारांची खरेदी
संसदेत सोमवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने रिझव्‍‌र्ह बँकेला कर्ज दर कमी करण्यास वाव दिल्याने गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात पुन्हा खरेदीचे सत्र अवलंबिले. परिणामी सेन्सेक्सने गेल्या सात वर्षांतील एकाच व्यवहारातील सर्वाधिक निर्देशांक झेप नोंदविली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही विनायास ७,२०० च्या पुढे जाता आले.
७७७.३५ अंशवाढीसह मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक मंगळवारी २३,७७९.३५ वर पोहोचला. सेन्सेक्सची यापूर्वीची एकाच व्यवहारातील उसळी १८ मे २००९ रोजी होती. या दिवशी मुंबई निर्देशांक २,११०.७९ अंशांनी उसळला होता. सेन्सेक्स व निफ्टी दोन्हीमध्ये ३ टक्क्य़ांहून अधिक वाढ नोंदली गेली.
नव्या आर्थिक वर्षांसाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात वित्तीय तुटीचे ३.५ टक्के आव्हान लीलया पेलले जाईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी स्पष्ट केले होते. या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनाही त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान उद्धृत केल्या होत्या. २०१६-१७ मध्ये सरकार कर्जउचल कमी (६ लाख कोटी रुपये) करणार असल्याने अर्थव्यवस्थेला आधार म्हणून रिझव्‍‌र्ह बँक व्याजदर कपातीची शक्यता निर्माण झाली आहे.
करचिंतेने बाजाराने प्रत्यक्षात सोमवारी मात्र घसरण नोंदविली होती. सप्ताहारंभीच्या सत्रात ६६० पर्यंत घसरण राखणारा सेन्सेक्स सोमवारीच ८०० हून अधिक झेप घेणारा ठरला होता. दिवसअखेर मात्र त्याने १५२.३० अंशांची आपटी नोंदविली होती.
तिकडे चीननेही पतधोरण सैल करण्याचे संकेत दिल्याने एकूणच आशियाई बाजारात तेजी नोंदली गेली. डॉलरच्या तुलनेत रुपयाही व्यवहारादरम्यान ६७.९५ वर असल्याचेही बाजाराच्या पथ्यावर पडले. सलग दुसऱ्या महिन्यात देशातील निर्मिती क्षेत्राने वाढ नोंदविणारा जाहीर झालेल्या एका खासगी अहवालानेही बाजारात चैतन्य निर्माण केले. एकूणच सेन्सेक्स सत्रात २३,८१८ पर्यंत झेपावला, तर निफ्टी ७,२३५ पर्यंत गेला होता. सेन्सेक्समध्ये आयटीसी, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, अदानी पोर्ट्स, गेल, टाटा मोटर्स हे तेजीतील समभाग आघाडीवर होते. सेन्सेक्समधील केवळ ओएनजीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर व डॉ. रेड्डीज या तीन समभागांचेच मूल्य घसरले. अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे सोमवारी घसरलेल्या वाहन, सिगारेट उत्पादक कंपन्यांच्या समभागांमध्ये मंगळवारी नफेखोरी येऊन त्यांचे मूल्य वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन निर्देशांक ४ टक्क्य़ांहून अधिक वाढ नोंदविणारे ठरले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक ३ टक्क्य़ांहून अधिक वाढ नोंदविणारे ठरले.

गुंतवणूकदार श्रीमंत
एकाच सत्रात गेल्या सात वर्षांतील सर्वोत्तम निर्देशांक नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता मंगळवारी २.५० लाख कोटी रुपयांनी वाढली. मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे समभाग मूल्य मंगळवारच्या ७७७ अंश वाढीने ८८.३४ लाख कोटी रुपयांवर गेले. पायाभूत सेवा क्षेत्राला उत्तेजन देण्याचा सरकारचा प्रयत्न २०१६-१७ साठीच्या अर्थसंकल्पाद्वारे दिसत असून वित्तीय तुटीच्या उद्दिष्टाबाबतच्या सरकारच्या निर्णयानेही गुंतवणूकदारांमध्ये मंगळवारी उत्साह दिसल्याचे मत यानिमित्ताने बीएनपी पारिबास म्युच्युअल फंडचे (समभाग) निधी व्यवस्थापक श्रेयस देवळकर यांनी व्यक्त केले.