मुंबई : सहा सत्रांतील तेजीनंतर, मंगळवारी घसरण नोंदविणाऱ्या भांडवली बाजाराने बुधवारी पुन्हा निर्देशांक वाढ राखली. व्यवहारात ३३० अंश झेप घेतल्यानंतर सेन्सेक्स सत्रअखेर मंगळवारच्या तुलनेत जवळपास शतकी निर्देशांक वाढ नोंदवत पुन्हा एकदा ३९ हजारांपुढे पोहोचला.

गुरुवारी मुंबई निर्देशांक ९४.९९ अंश वाढीसह ३९,०५८.८३ वर पोहोचला. तर १५.७५ अंश वाढीने निफ्टी ११,६०४.१० पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्सने मंगळवारी ३३४ अंश घसरणीने त्याचा ३९ हजारांचा स्तर सोडला होता.

जागतिक भांडवली बाजारातील तेजीला येथील बाजारातील माहिती तंत्रज्ञान, वित्त तसेच वाहन क्षेत्रातील समभागांनी खरेदीसाथ दिल्याने सेन्सेक्ससह निफ्टी गुरुवारअखेरही वाढते राहिले. मुंबई निर्देशांक सत्रात ३९,२०० पर्यंत पोहोचला होता.

मुंबई निर्देशांकातील एचसीएल टेक, मारुती सुझुकी, स्टेट बँक, एचडीएफसी लिमिटेड, हीरो मोटोकॉर्प आदी जवळपास ३ टक्क्यांपर्यंत वाढले. इन्फोसिसचा समभाग  मोठय़ा घसरणीतून वर येताना एक टक्क्याची वाढ नोंदविणारा ठरला. तर भारती एअरटेल, वेदांता, ओएनजीसी, रिलायन्स, कोटक महिंद्र बँक, येस बँक ३.५९ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकपयोगी वस्तू, ऊर्जा १.१८ टक्क्यापर्यंत वाढले. तर दूरसंचार, तेल व वायू, स्थावर मालमत्ता, पोलाद निर्देशांक ३ टक्क्यांपर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप काही प्रमाणात घसरला. तर स्मॉल कॅप पाव टक्क्याने वाढला.