सेन्सेक्स, निफ्टीत सप्ताहारंभी तेजी; बँक समभागांवर मात्र दबाव

वाढलेली घाऊक महागाई, लांबणीवर पडणाऱ्या मान्सूनचा अंदाज, खनिज तेल तसेच मौल्यवान धातूचे वाढते दर या साऱ्यांकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी नव्या सप्ताहाच्या पहिल्याच सत्रात नफेखोरी अवलंबिली. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६३.६६ अंशांनी वाढत २५,३५१.६२ पर्यंत गेला, तर निफ्टी दिवसअखेर ४५.८५ अंशांनी उंचावत ७,८६०.७५ वर स्थिरावला.
आठवडय़ाच्या सुरुवातीलाही बँक समभागांवर मात्र दबाव कायम राहिला. मुंबई शेअर बाजारातील बँक निर्देशांक १३७ अंशांनी घसरला. स्टेट बँक या सार्वजनिक बँकांसह आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग ४ टक्क्यांहून अधिक घसरले. सत्रात सेन्सेक्स २५,६८८.४६ तर निफ्टी ७,८७३.९० पर्यंत झेपावला.
शुक्रवारच्या ३०१ अंश घसरणीसह सेन्सेक्सने गेल्या आठवडय़ाची अखेर केली होती. बाजारातील गुंतवणुकीचे एक माध्यम असलेल्या पी-नोट्सवरील सेबीच्या र्निबधाचा हा परिणाम होता.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.३० व ०.०९ टक्क्यांनी उंचावले. सेन्सेक्समधील ३० पैकी १७ समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये डॉ. रेड्डीज, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचडीएफसी लिमिटेड, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, टाटा स्टील हे आघाडीवर राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, पोलाद, वाहन, तंत्रज्ञान, आरोग्यनिगा हे वरचढ राहिले.
बँक समभाग मूल्यावर दबाव
तेजी नोंदविणाऱ्या भांडवली बाजारात सोमवारी बँक क्षेत्रातील समभागांवरील दबाव कायम राहिला. अधिकतर सार्वजनिक बँकांनी गेल्या तिमाहीत वाढत्या तोटय़ाची तसेच कमी नफ्याची कामगिरी बजाविल्याचा हा परिणाम आहे.
वाढत्या अनुत्पादक कर्जामुळे अनेक बँकांना यंदा करावी लागणारी आर्थिक तरतूदही मोठय़ा प्रमाणात वाढली असून त्याची चिंताही समभाग हालचालींवर दिसून आली.
मॉरिशस कराबाबत सरकारच्या ठाम भूमिकेकडेही बाजाराने सोमवारी दुर्लक्ष केले. देशात केवळ गुंतवणूक वाढावी म्हणून करविषयक तडजोड केली जाणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी स्पष्ट केले. यावर बाजाराने फार मोठी प्रतिक्रिया दिली नाही. उलट गेल्या आठवडय़ात याबाबत संकेत मिळताच बाजारात पडझड अनुभवली गेली होती.

खनिज तेलाचा २०१६ मधील नवा उच्चांक
लंडन : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर २०१६ मध्ये पहिल्यांदाच वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. इंधन उत्पादनातील अमेरिकेची संथ प्रगती आणि चिनी शुद्धीकरण प्रकल्पातील वाढते उत्पादन यामुळे काळ्या सोन्याने दरवाढ नोंदविल्याचे सांगितले जाते.

रुपया दोन महिन्यांच्या तळात
मुंबई : रुपयाने सप्ताहारंभीच गेल्या दोन महिन्यांतील तळ अनुभवला. डॉलरच्या तुलनेत चलन सोमवारी ३ पैशांनी घसरत ६६.८० वर राहिले. रुपयातील ही तिसऱ्या व्यवहारातील घसरण होती.

२०१६ मध्ये सेन्सेक्सचा प्रवास २६ हजारापर्यंतच
जागतिक स्तरावरील दलाली संस्था असलेल्या एचएसबीसीने सेन्सेक्सचा चालू वर्षांतील प्रवास हा २६ हजारांपर्यंतच राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. देशाच्या वाहन तसेच काही निवडक क्षेत्रात तेजीचे वातावरण येण्याची शक्यता असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेकडून फारशा अपेक्षा नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. एचएसबीसीने यापूर्वी सेन्सेक्सचा अंदाज २५ हजार व्यक्त केला होता. तुलनेत यंदा तो काहीसा वाढविण्यात आला आहे. आर्थिक सुधारणा प्रगतीपथावर येत असल्याबद्दलही याबाबतच्या अहवालात औद्योगिक विश्लेषक आशुतोष नारकर यांनी मत व्यक्त केले आहे.

सोने पुन्हा ३० हजारांवर
मुंबई : मौल्यवान धातूच्या दरात पुन्हा एकदा वाढ नोंदली जात आहे. स्टॅण्डर्ड सोने सोमवारी १० ग्रॅममागे १९० रुपयांनी वाढत थेट ३० हजार रुपयांच्याही पल्याड गेले.
पांढऱ्या धातूला ३०,०७० रुपयांचा भाव मिळाला. शुद्ध सोनेही याच प्रमाणात आणि त्याच वजनामागे वाढत ३०,२२० रुपयांपुढे गेले. तर चांदीच्या दरातील वाढही किलोसाठी तब्बल ५१० रुपयांची होती. चांदीचा सत्रअखेर दर ४१,५०५ रुपयांवर स्थिरावला. चांदीने गेल्याच आठवडय़ात किलोमागील ४० हजार रुपयांचा दर गाठला होता.