तिमाहीत अपेक्षेपेक्षा चमकदार कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या समभागांना गुंतवणूकदारांनी मंगळवारी खरेदीसाठी पसंती दिल्याने भांडवली बाजाराचे निर्देशांक साडेतीन महिन्याच्या तळातून सावरले. २१९.३९ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,४८२.१४ वर पोहोचला, तर ७१.८० अंश वाढीसह निफ्टी ८,२८५.६० पर्यंत दिवसअखेर पोहोचला.

घसरण रोखून व्यवहारात ६३ पर्यंत भक्कम बनलेल्याा रुपयाचेही स्वागत बाजाराने मंगळवारी केले. गेल्या सलग तीन व्यवहारात ७१३ अंशांनी घसरणारा सेन्सेक्स मंगळवारच्या सत्रात मात्र सोमवारच्या २७,२१५.६१ पातळीवरून उंचावला. तर निफ्टीनेही व्यवहारात ८,३००चा स्तर गाठणारी धमक दाखवली.
मारुती सुझुकीने गेल्या अनेक तिमाहीनंतर सर्वाधिक फायद्याचे निकाल सोमवारी जाहीर केल. त्याचा परिणाम कंपनीचा समभाग ५.१९ टक्क्यांसह ३,८३६ रुपये या वर्षभराच्या उच्चांकाला पोहोचला, तर सोमवारच्या व्यवहारानंतर आयसीआयसीआय बँकेनेही नफ्यातील वित्तीय निष्कर्ष जाहीर केले. परिणामी बँकेच्या समभागानेही सत्रातील सर्वोच्च ८.२ टक्के झेप नोंदवत त्याचे ३२६.६५ रुपयांचा स्तर गाठला.
याचबरोबर चालू आर्थिक वर्षांत भारताचा अर्थ प्रवास ७.५ टक्क्यांपुढे राहील, या जागतिक बँकेच्या आशादायी वक्तव्यानेही बाजाराला स्फुरण चढले. वाढीव विकासदराबरोबरच महागाई दर व चालू खात्यातील तूट कमी होईल, अशी पावती जागतिक बँकेने दिली आहे.
व्यवहारात गुंतवणूकदारांनी काहीशी नफेखोरी केल्याने सेन्सेक्स २७,०७३.२५ या त्याच्या सत्रातील नीचांकापर्यंतही आला होता. मात्र दिवसअखेर त्याने सकारात्मक प्रवास नोंदविला. सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, भेल, भारती एअरटेल, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक यांच्या समभागांची खरेदी झाली. सेन्सेक्समधील १७ समभाग घसरले. बँक, वाहन, स्थावर मालमत्ता, ऊर्जा क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही १.५ टक्क्यांपर्यंत वाढले होते.