देशाची घसरती निर्यात आणि रुपयाचा ६५ पुढील प्रवास याची चिंता गुंतवणूकदारांनी नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाही वाहिली. परिणामी सेन्सेक्सने जवळपास २०० अंश आपटी नोंदवित २८ हजाराखालील स्तर अनुभवला. तर अर्धशतकापेक्षाही कमी अंश आपटीने निफ्टीनेही ८,५०० हा टप्पा सोडला. भांडवली बाजाराच्या सप्ताहारंभीच्या घसरणीने गेल्या सलग दोन दिवसांची तेजीही सोमवारी थांबली.
शुक्रवारच्या व्यवहाराद्वारे गेल्या आठवडय़ातील व्यवहाराचा शेवट करताना सेन्सेक्सने सलग दोन व्यवहारात ५५०.०५ अंश घसरण नोंदविली होती. सोमवारच्या सत्राची सुरुवात तेजीसह, २८,०९५.९७ वर करणारा सेन्सेक्स सकाळच्या व्यवहारातच २८ हजाराच्याही खाली आला. दिवसभरात त्यावरील दबाव कायम राहिला. सत्रात २७,७३९.१३ हा तळ गाठल्यानंतरही बाजार शुक्रवारच्या तुलनेत घसरणीपासून सावरू शकला नाही.
गेल्या आठवडय़ात जुलैमधील निर्यात घसरल्याचे आकडे शुक्रवारच्या भांडवली बाजारातील व्यवहार संपुष्टात आल्यानंतर समोर आले होते. त्यातच सोमवारच्या व्यवहारातही परकी चलनाचा प्रवास ६५ च्या खालीच कायम राहिल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचे धोरण अनुसरले. बँक क्षेत्रातील समभाग वगळता इतर निर्देशांकांमधील समभागांमध्ये मोठी घसरण नोंदली गेली. डॉलर वधारूनही माहिती तंत्रज्ञान समभागांमध्ये नरमाई होती.
जुलैमधील निर्यात सलग आठवडय़ा महिन्यात घसरताना २३.१३ अब्ज डॉलपर्यंत येऊन ठेपली आहे. तर सोमवारच्या सत्रात रुपया व्यवहारात ६५.३७ पर्यंत आपटला होता. गेल्या आठवडय़ात वस्तू व सेवा कर विधेयक रेंगाळल्याचे सावट बाजारावर उमटले होते.
सोमवारी सेन्सेक्समधील घसरलेल्या समभागांमध्ये सिप्ला, हिंदाल्को, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, वेदांता, अ‍ॅक्सिस बँक, डॉ. रेड्डीज लॅब, रिलायन्स इंडस्ट्रिज, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, एचडीएफसी, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, मारुती सुझुकी, आयटीसी, इन्फोसिस, टीसीएस या आघाडीचे समभाग मूल्य रोडावले.

‘व्याजदर कपात मागणीसाठी प्रोत्साहनपूरक’
खनिज तेलाच्या घसरत्या किंमती, सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि व्याजदर कपात यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढण्याची आशा बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने व्यक्त केली आहे.
या साऱ्यांचा परिणाम देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात एक टक्क्य़ाची भर पडण्यावर होईल, असेही आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. संभाव्य व्याजदर कपातीमुळे विविध वाहनांसाठीच्या कर्जासाठीची मागणी येत्या कालावधीत वाढेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
येत्या काही वर्षांमध्ये दुचाकी व प्रवासी कारची विक्री ३ टक्के तर छोटय़ा वाणिज्यिक वापराची वाहने ६ टक्क्य़ांनी तसेच अतिशह मोठी अवजड वाहने ही वार्षिक १० टक्क्य़ांपर्यंत वाढतील, असेही म्हटले गेले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक समभागांना केंद्र सरकारच्या ‘इंद्रधनुष’नुसार भांडवली सहाय्य मिळाल्याच्या पाश्र्वभूमिवर बाजारातील सूचिबद्ध बँक समभागांचे मूल्य सप्ताहारंभीही उंचावले. एकूण सेन्केक्स सोमवारी घसरला असला तरी बँक निर्देशांक व त्यातील समभागांमध्ये दिवसअखेपर्यंत तेजी नोंदली गेली.
बँक ऑफ बडोदा रु. २१२.४० (+१५.१५%)
कॅनरा बँक रु. ३४६.६० (+१३.४२%)
बँक ऑफ इंडिया रु. १८५.१० (+८.७२%)
पंजाब नॅशनल बँक रु. १७३.०५ (+४.०९%)
स्टेट बँक ऑफ इंडिया रु. २७९.०५ (+३.९५%)
एस अ‍ॅन्ड पी बीएसई बँक निर्देशांक :
२१,५९७.५५ +१०९.३१ (+०.५१%)