* निर्देशांकाची वर्षांतील दुसरी मोठी उसळी
* निफ्टी ८,१०० सहज पार
अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हने जानेवारी २०१६ पर्यंत टाळलेल्या व्याजदर वाढीच्या निर्णयाने जगभरातील प्रमुख शेअर बाजारांची नव्या सप्ताहाची सुरुवात तेजीने झाली. यामध्ये एकदम ५६४.६० अंश झेप घेत सेन्सेक्सने २०१५ मधील दुसरी मोठी निर्देशांक वाढ नोंदविली; त्याचबरोबर निफ्टीलाही ८,१०० या महत्त्वाच्या पातळीला सहज ओलांडता  आले.
५६४.६० अंश वाढीसह सेन्सेक्स २६,७८५.५५ वर पोहोचला, तर १६८.४० अंश वाढीमुळे निफ्टी ८,११९.३० पर्यंत गेला. २ टक्क्यांहून अधिकच्या रूपात दोन्ही निर्देशांकांनी १५ जानेवारी २०१५ नंतरची सर्वोत्तम झेप सोमवारी नोंदविली. सेन्सेक्सने या दिवशी ७२९ अंश वाढ राखली होती.
बाजारातील तेजीमय वातावरणात गुंतवणूकदारांची मालमत्ताही एकाच व्यवहारात १.८४ लाख कोटी रुपयांनी वाढली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मूल्य दिवसअखेर पुन्हा एकदा १०० कोटी रुपयांनजीक – ९८,३९,३५७ कोटी रुपयांवर पोहोचले.
गेल्या सप्ताहअखेर जाहीर झालेल्या रोजगार वाढीच्या आकडय़ांच्या जोरावर फेडरल रिझव्‍‌र्हची बहुप्रतीक्षित व्याजदर वाढ २०१५ अखेपर्यंत होण्याची शक्यता नसल्याने आशियासह सर्वच प्रमुख बाजारांनी सोमवारी तेजी नोंदविली.
सलग चौथ्या सत्रातील तेजीमुळे सेन्सेक्समधील वाढ आता १,१६८.७१ अंश राखली गेली आहे. २९ सप्टेंबर रोजी रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्का कपात केल्याच्या दिवसापासून शेअर बाजाराने अद्याप मागे वळून पाहिलेच नाही.
परकी चलन विनियम व्यासपीठावर डॉलरच्या तुलनेत महिन्यातील भक्कमता नोंदवीत असलेल्या रुपयामुळेही बाजारातील चैतन्यात अधिक भर पडली. त्याचबरोबर दुसऱ्या तिमाहीचे आता सुरू होणाऱ्या कंपन्यांच्या वित्तीय निष्कर्षांबाबतची उत्सुकता बाजारात सोमवारच्या तेजीतील व्यवहाराने नोंदली गेली.
सेन्सेक्स आता सहा आठवडे म्हणजे २१ ऑगस्ट आधीच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. तर एकाच व्यवहारातील त्याची सोमवारची झेप ही २०१५ मधील दुसरी मोठी उडी ठरली आहे. १५ जानेवारीनंतरची सत्रातील ही सर्वोत्तम वाढ राहिली आहे.
मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीत राहिले, तर व्याजदराशी निगडित भांडवली वस्तू, पायाभूत सेवा, बँक, पोलाद आदी निर्देशांकांत अधिक  वाढ नोंदली गेली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप हे छोटय़ा गुंतवणूकदारांचे प्रमुख निर्देशांक १.७५ टक्क्यांनी झेपावले.
सप्टेंबरमधील वाहन विक्रीच्या वाढीच्या जोरावर टाटा मोटर्सचा समभाग ६.१३ टक्क्यांसह सेन्सेक्सच्या तेजीत अग्रणी राहिला, तर टाटा स्टील,  आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, एचडीएफसी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, हिरो मोटोकॉर्प यांचेही समभाग चार टक्क्यांपर्यंत वाढले.
मारुती सुझुकी, डॉ. रेड्डीज, ल्युपिन व हिंदुस्थान युनिलिव्हर हे चार समभाग वगळता सेन्सेक्समधील इतर सर्व २६ समभागांचे मूल्य वाढले. मुंबई शेअर बाजारात ७८७ समभाग घसरणीत तर २,००१ समभागांची नोंद तेजीच्या समभागांमध्ये झाली.
दिवसभर तेजीत राहिलेल्या   दोन्ही निर्देशांकांत दिवसअखेर गुरुवारच्या तुलनेत अनुक्रमे २.१५ व २.१२ टक्के वाढ नोंदली गेली. महात्मा गांधीनिमित्त गेल्या शुक्रवारी बाजारात व्यवहार झाले नाहीत.
तेजीचे त्रिगुण
१अमेरिकेची फेडरल रिझव्‍‌र्हची संभाव्य व्याजदर वाढ पुढील वर्षांच्या सुरुवातीपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता बळावली आहे. जागतिक महासत्तेतील रोजगारविषयक सुधारणा आणि भक्कम विकास दर या सुखावणाऱ्या गोष्टी आहेत. तरी यातून लगेचच दरवाढीची घाई नाही, असे निर्माण झालेले चित्र जागतिक शेअर बाजारातील उधाणास निमित्त ठरले.
२ चालू आर्थिक वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा विकासदर ७.५ टक्के राहण्याबाबत सरकारकडून आशावाद व्यक्त केला गेला. विद्यमान एकूण आर्थिक वर्षांत कर संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणे शक्य नसले तरी विकास दर उंचावता राहील, अशी ग्वाही अर्थ व्यवहार सचिवांनी दिल्याने बाजारात उत्साह कायम राहिला.
३उद्योगक्षेत्र, कंपन्यांबाबतचे सकारात्मक वृत्तही बाजारात तेजीत वाढीस कारणीभूत ठरले. ‘सिटी’ या दलाल पेढीमार्फत लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला खरेदीसाठी पसंती दिली गेल्याने कंपनीचा समभाग उंचावला, तर नऊ ऊर्जा वितरण कंपन्यांना ४.३ लाख कोटी रुपयांचे कर्जसहाय्य देण्यास केंद्राच्या मंजुरीच्या शक्यतेने ऊर्जा क्षेत्रातील समभाग वधारले.