सेन्सेक्स, निफ्टीची महिन्यातील सप्ताह घसरण

सप्ताहातील अखेरच्या अस्थिर वातावरण व्यवहारात प्रमुख निर्देशांकांनी अखेर नाममात्र वाढ नोंदविली. जागतिक स्तरावरील सरंक्षण सिद्धतेचा बाजारातील विपरीत परिणाम अद्यापही येथील प्रमुख निर्देशांकावर कायम आहे. २४.७८ अंश वाढीसह सेन्सेक्स ३१,६८७.५२ वर स्थिरावला. तर निफ्टीत ४.९० अंश वाढ होऊन राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९,९३४.८० वर थांबला.

प्रमुख निर्देशांकांनी गेल्या महिन्याभरातील पहिली सप्ताह घसरणही याच रूपात नोंदविली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची भक्कमताही बाजाराला सप्ताहअखेरच्या व्यवहारात तेजी नोंदविण्यास हातभार लावणारी ठरली. सप्ताह तुलनेत मात्र सेन्सेक्सने २०४.७१ अंश घसरण अनुभवली आहे. तर निफ्टीचे या दरम्यान ३९.६० अंशांचे नुकसान झाले आहे.

चालू आठवडय़ातील पहिल्या दिवसाच्या व्यवहाराची सुरुवात करताना मुंबई निर्देशांक ३१,६९४.१५ या वरच्या टप्प्यावर होता. सत्रात तो ३१,७६३.७० पर्यंत उंचावला. स्थानिक तसेच अन्य गुंतवणूकदारांमार्फत बाजारात खरेदीचे सत्र कायम राहिले. मात्र अस्थिरतेच्या वातावरणात सेन्सेक्सने ३१,६१९ पर्यंत खालीही आला. निफ्टीचा सत्रातील वरचा टप्पा ९,९१३.३० पर्यंत गेला. तर ९,९६३.६० हा त्याचा व्यवहारातील तळ नोंदला गेला. सत्रात वरच्या टप्प्याला पोहोचलेल्या भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी नफेखोरी अवलंबिल्यानेही बाजाराला व्यवहारात काही वेळ नकारात्मक प्रवास नोंदविणे भाग पडले.

सेन्सेक्समध्ये लार्सन अँड टुब्रो सर्वाधिक, ४ टक्क्यांनी वाढला. तसेच कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी बँक, आयटीसी, मारुती सुझुकी, टीसीएस, विप्रो, एशियन पेंट्स, आदी एक टक्क्यापर्यंत वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, खनिकर्म, भांडवली वस्तू, बँक आदी तेजीच्या यादीत राहिले. प्रमुख निर्देशांकांनी वाढ नोंदविली असली तरी मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये मात्र घसरण झाली.