अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढीनंतरही तेजीत राहणाऱ्या भांडवली बाजारांनी सप्ताहअखेर देशाच्या आर्थिक विकास दराबाबत घसरलेल्या अंदाजाविषयी चिंता नोंदविली. परिणामी गेल्या सलग चार व्यवहारांतील सेन्सेक्सच्या तेजीत खंड पडला.
सेन्सेक्स त्याच्या पंधरवडय़ाच्या वरच्या टप्प्यावरून खाली उतरला. २८४.५६ अंश घसरणीने हा निर्देशांक २५,५१९.२२ पर्यंत आला. तर ८२.४० अंश घसरणीमुळे निफ्टीने त्याचा ७,८०० चा स्तर सोडला आणि ७,७६१.९५ वर तो स्थिरावला.
सेन्सेक्सची गेल्या चार व्यवहारांत ७६० अंश तेजी राहिली आहे. तर साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स १.८९ टक्क्यांनी वाढला आहे. ९ ऑक्टोबरनंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ ठरली आहे.
अमेरिकेने एच१बी व एल१ व्हिसाकरिता विशेष शुल्क लागू केल्याने त्याचा परिणाम या देशावर व्यवसायासाठी अधिकतर निर्भर असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस, विप्रो यांचे समभाग मूल्य जवळपास दोन टक्क्यांपर्यंत घसरले.