ऑगस्टच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ‘एनएसईएल’ सौदे स्थगिती प्रकरण अस्वस्थ व्यवहाराची नांदी ठरले आणि भांडवली बाजाराच्या घसरणीचा क्रम सलग सातव्या सत्रातही कायम राहिला. दिवसभरात ४०० अंशांपर्यंतची वाढ राखणारा सेन्सेक्स दिवसअखेर मात्र २८.५१ अंश घसरणीसह १९,३१७.१९ पर्यंत खाली आला. तर निफ्टी १४.१५ अंशाच्या घटीने ५७२७.८५ वर येऊन थांबला. बुधवारी उशिरा अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हने रोखे खरेदी कायम ठेवण्याबाबत सुचोवाच केल्याने तसेच या देशातील सकल उत्पादन दरही उंचावण्यात आल्याने येथील भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण होते. असे असताना सेन्सेक्स सुरुवातीला १९,५६९.२० या दिवसाच्या वरच्या टप्प्यावर होता. मात्र दुपारपूर्वीच त्यात घसरण सुरू झाली. रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केलेल्या कमी विकासदराची चिंता यावेळी व्यवहारांवर उमटलेली दिसून आली. एचएसबीसीच्या सर्वेक्षणात जुलैमधील कमी निर्मिती क्षेत्राची आकडेवारीही त्याला कारणीभूत ठरली. जूनमध्ये मंदावलेल्या प्रमुख उद्योग क्षेत्राची अवघी ०.१ टक्के वाढीचे सावटही बाजारात पाहायला मिळाले.