भांडवली बाजारातील नरमाई सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. ५९.२३ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स आठवडाअखेर २७ हजारावर येऊन ठेपला आहे. मुंबई निर्देशांक शुक्रवारी २७,०२६.७० वर बंद झाला. आघाडीच्या कंपन्यांच्या वधारलेल्या दरांवर गुंतवणूकदारांनी विक्रीचे धोरण अवलंबिल्याने निफ्टीही ९.१० अंश घसरणीमुळे ८,०८६.८५ वर स्थिरावला.
सलग नऊ व्यवहारांत सेन्सेक्सने वाढ नोंदविली होती. यामुळे मुंबई निर्देशांकाने बुधवारी २७,२२५.८५ हा व्यवहारातील तर २७,१३९.९४ ही सत्रअखेरचा टप्पा गाठला होता. बाजारात गुरुवारी ५४.०१ अंश घसरण नोंदली गेली होती. तर निफ्टीनेही गुरुवारीच घसरणीसह सलग चार व्यवहारांतील तेजी मोडित काढली होती.
सेन्सेक्सने सप्ताहाअखेरच्या व्यवहारात २७ हजाराखाली येताना २६,९२०.५६ हा दिवसाचा तळही गाठला होता. सेन्सेक्समधील १७ समभागांचे मूल्य शुक्रवारी घसरले. गुरुवारी १८.६५ अंश नुकसान सोसणाऱ्या निफ्टीनेही आठवडय़ाच्या शेवटच्या दिवसाचा ८,१२२.७० ते ८,०४९.८५ असा खालचा प्रवास नोंदविला.
एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स यांच्या समभागांची विक्री झाली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन निर्देशांक सर्वाधिक ०.६५ टक्क्यांनी घसरला. उलट १.१५ टक्क्यांसह बांधकाम निर्देशांक तेजीत आघाडीवर राहिला. स्मॉल व मिड कॅपही अनुक्रमे १.२५ व ०.५६ टक्क्यांनी उंचावले.
आठवडय़ाभरात सेन्सेक्स ३८८.५९ अंशांनी उंचावला आहे. सलग चौथ्या सप्ताहातील तेजी त्याने राखली आहे. युरोपीयन मध्यवर्ती बँकेच्या व्याजदर कपातीनंतर नव्या उपाययोजनांच्या धर्तीवर आशियाई बाजारात घसरणीचे वातावरण होते. तर शुक्रवारी उशिरा जाहीर होणाऱ्या अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारीनंतर भारतीय भांडवली बाजारातील आगामी सप्ताहाची प्रतिक्रिया अवलंबून असेल.
युनायटेड स्पिरिट्स व्यवहारात ७ टक्क्यांपर्यंत आपटला
संचालक मंडळाने मुख्य प्रवर्तक विजय मल्या यांच्या यूबी समूहातील कंपन्यांना दिलेल्या कर्जाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचा समभाग शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात ४ टक्क्यांपर्यंत आपटला. समभागाने सलग दुसऱ्या दिवशी घेतलेली ही गटांगळी आहे. मार्च २०१४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीचा तोटा ४४,८८.७७ कोटी रुपयांपर्यंत जाण्यास कंपनीची काही संशयित कर्जेच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत ब्रिटनच्या डिआज्जिओच्या सध्या ताब्यात असलेल्या कंपनीने हे पाऊल उचलले होते. मुंबई शेअर बाजारावर याचा विपरीत परिणाम होत युनायटेड स्पिरिट्सचा समभाग व्यवहारात ६.८७ टक्क्यांनी घसरला. मात्र दिवसअखेर ४.६५ टक्के घसरणीसह २,२७९.०५ रुपयांवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजारात तो ३.८६ टक्क्यांच्या आपटीसह २,३००.०५ रुपयांपर्यंत खाली आला. दोन्ही बाजारांमध्ये त्याचे अनुक्रमे १.२१ व ९ लाख समभागांचे व्यवहार शुक्रवारी झाले.