गेल्या काही दिवसांतील सलगच्या वधारणेमुळे ऐतिहासिक उच्चांकाला गाठणाऱ्या भांडवली बाजारांनी गुरुवारी अखेर माघार घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५४.०१ अंश घसरणीसह २७,०८५.९३ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८.६५ अंश नुकसानासह ८,०९५.९५ पर्यंत खाली आला. गुंतवणूकदारांच्या नफेखोर धोरणामुळे सेन्सेक्स गेल्या नऊ दिवसांतील तेजीनंतर २७ हजारांवर येऊन ठेपला, तर निफ्टीही आता ८,१००च्या खाली उतरला आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या स्थापनेचे १०० दिवस व पहिल्या तिमाहीतील वाढता विकास दर तसेच कमी होणारी चालू वित्तीय खात्यातील तूट या जोरावर भांडवली बाजार गेल्या काही दिवसांपासून तेजीवर स्वार होता. असे असताना सेन्सेक्ससह निफ्टीने बाजारमंचाच्या स्थापनेपासूनच्या नव्या उच्चांकाचे शिखर गाठले होते. या वधारत्या वातावरणात सेन्सेक्समध्ये नऊ व्यवहारात ८२५ अंशांची वाढ नोंदली गेली. बुधवारीही व्यवहारात मुंबई निर्देशांक २७,२२५.८५ जवळ होता, तर निफ्टी ८,१४१.९० पर्यंत पोहोचला होता. निफ्टीने पाच सत्रांत २०९.८५ अंशांची भर घातली होती.
गुरुवारच्या सत्राची सुरुवातही तेजीसह झाली. सेन्सेक्स या वेळी २७,२२५.८५ पर्यंत झेपावला. यानंतर मात्र त्यात घट नोंदली जाऊ लागली. सेन्सेक्स २७ हजारांखाली उतरत २६,९७२.३९ या दिवसाच्या नीचांकावर आला. तर निफ्टीची सत्रातील किमान पातळी ८,१००च्या खाली येत ८,०६०.९० पर्यंत उतरली.
गुंतवणूकदारांनी गेल्या काही व्यवहारांत वधारलेल्या पोलाद, बांधकाम, भांडवली वस्तू, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, बँक क्षेत्रातील समभागांच्या मूल्यांचा लाभ घेत त्यातील समभाग विक्रीचा मारा केला. ४.४२ टक्क्यांसह बांधकाम निर्देशांक सर्वाधिक आपटला होता. सेन्सेक्समधील भेल हा सर्वाधिक ४.४४ टक्क्यांसह घसरला. मुंबई निर्देशांकातील १९ कंपनी समभाग नकारात्मक यादीत विसावले.
रुपया १३ पैशांनी बळावला
सलग दुसऱ्या दिवशी वधारताना रुपया गुरुवारी महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला. डॉलरच्या तुलनेत १३ पैशांच्या वाढीने रुपया ६०.३६ पर्यंत उंचावला. बुधवारी १९ पैशांची वाढ नोंदविल्यानंतर रुपया नव्या सत्रात ६०.४६ या वरच्या टप्प्यावर खुला झाला. भांडवली बाजारातील नफेखोरीचे काहीसे सावट चलन व्यवहारावर उमटल्याचे निरीक्षण व्हेरासिटी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित ब्रह्मभट्ट यांनी नोंदविले. तर युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या व्याजदर वाढीच्या बैठकीचा परिणामही चलन व्यवहारावर दिसून आल्याचेही ते म्हणाले.