सलग सात सत्रातील घसरण मोडीत काढत सेन्सेक्सने गुरुवारी द्विशतकी निर्देशांक वाढ नोंदविली.जगातील प्रमुख भांडवली बाजारांमधील तेजीकडून संकेत घेत सेन्सेक्सने २०५.०२ अंश कमाईसह २०,३९९.४२ पातळी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील ६६.५५ अंश वधारणेमुळे ६,०.५६.१५ पर्यंत पोहोचला. मोहरमनिमित्ताने बाजार शुक्रवारी बंद राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या सप्ताहाचा त्याचा व्यवहाराचा गुरुवार हाच शेवटचा दिवस होता.
गेल्या सातही व्यवहारांत मुंबई शेअर बाजाराने एकूण १,०४४.९६ अंशांची घसरण नोंदविली आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित ऑक्टोबरमधील महागाईचे वाढते आकडे जाहीर होऊनही सेन्सेक्स विदेशातील बाजारांच्या तेजीवर दिवसभरात २०,५६८.९९ पर्यंत झेपावला.
अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेच्या आगामी प्रमुख जेनेट येलेन यांनी अर्थव्यवस्था सुधारासाठीच्या आर्थिक उपाययोजना कायम राहतील, या दिलेल्या आश्वासनाने एकूणच जागतिक बाजारात गुरुवारी तेजी नोंदली गेली, तर भारतात ऑक्टोबरमधील महागाई दर गेल्या आठ महिन्यांत सर्वोच्च स्थानावर पोहोचूनही त्याचे नकारात्मक पडसाद बाजारावर उमटले नाही. बँकांमधील रोकड उपलब्धतेच्या दृष्टीने नव्या उपाययोजना जाहीर होण्याच्या निमित्ताने व्याजदराशी निगडित वाहन, गृह, बँक निर्देशांक तेजीत आले.