महिन्यातील सौदापूर्तीच्या अखेरच्या दिवशी भांडवली बाजारातील गुंतवणूकदार मालामाल झाले. चालू खात्यातील तुटीची दरी कमी झाल्याने डॉलरच्या तुलनेत सावरलेला रुपया पाहून गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला आठवडय़ाच्या उच्चांकावर नेऊन ठेवले आणि गुंतवणूकदारांची मालमत्ताही एक लाख कोटी रुपयांनी वधारली. ३२३.८३ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक १८,८७५.९५ वर पोहोचला, तर जवळपास दीड टक्क्यांचीच वाढ नोंदवित राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९३.६५ अंश वधारणेसह ५,६८२.३५ वर बंद झाला.
डॉलरच्या तुलनेत ढासळत्या रुपयाने भांडवली बाजारावर गेल्या काही सत्रांपासून दबाव निर्माण केला होता. कालच्या सत्रात रुपया ६०.७२ अशा सार्वकालिक नीचांकापर्यंत गेल्यानंतर सेन्सेक्सही ७७ अंशांनी रोडावला होता. गुरुवारी भांडवली बाजारात चालू महिन्यातील सौदापूर्तीचा अखेरचा दिवस होता. त्यातच गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीतील सुधाराचे चालू खात्यातील तुटीचे आकडे जाहीर झाल्यानंतर रुपयाही दिवसभरात ६०.११ पर्यंत सावरला. या सर्वाचा परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर होऊन भांडवली बाजारात त्यांनी खरेदीचा सपाटा लावला. रिलायन्स, एचडीएफसी, इन्फोसिस, ओएनजीसीसारखे आघाडीचे समभाग तेजीत होते. त्यांच्यातील मूल्य वाढ ४.१४ टक्क्यांपर्यंतची होती. ३० पैकी २० समभाग तर १३ पैकी ११ क्षेत्रीय निर्देशांक तेजीची वाटचाल नोंदवित होते. माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण, बांधकाम, बँक समभागांच्या मूल्यांमध्ये विशेष चढाव पाहायला मिळाला.
 चीनवगळता इतर आशियाई बाजारातही गुरुवारी तेजी नोंदली गेली.

मौल्यवान धातूतील नरमाई कायम
भांडवली बाजाराचा सेन्सेक्स आणि परकी चलन व्यवहारात रुपया सावरला असतानादेखील सराफा बाजारातील घसरण कायम आहे. शहरात सोन्यासह चांदीचे दर पुन्हा खाली आले. मुंबई सराफा बाजारात सोने तोळ्यासाठी कालच्या तुलनेत १३५ रुपयांनी कमी होत २६,०१० रुपयांवर स्थिरावले, तर चांदीचे दरही गुरुवारी किलोसाठी २५ रुपयांनी कमी होत ४०,४५० रुपयांवर स्थिरावले.