निर्देशांकांची विक्रमी आगेकूच सुरूच

मुंबई : कंपन्यांची चमकदार तिमाही कामगिरी आणि जागतिक बाजारांचे सकारात्मक संकेत या परिणामी स्थानिक भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी उच्चांकांना गाठणारी आगेकूच बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कायम राखली. याच क्रमात ‘सेन्सेक्स’ने इतिहासात प्रथमच ५४ हजारांचा टप्पा ओलांडून, बाजारावरील तेजीवाल्यांचा वरचष्मा अबाधित असल्याचे दाखवून दिले.

बँकिंग अग्रणी स्टेट बँकेने, बुडीत कर्ज मालमत्तेत घसरणीसह, जूनअखेर तिमाहीत निव्वळ नफा ५५ टक्क्य़ांच्या वाढीसह ६,५०४ कोटी रुपयांवर नेला आहे. या कामगिरीचा सकारात्मक परिणाम म्हणून बुधवारी जवळपास सर्वच बँका आणि वित्तीय समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी दमदार खरेदी केली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही मुख्य निर्देशांकांच्या सलग तिसऱ्या व्यवहारातील मुसंडीत याचे मोठे योगदान राहिले. सेन्सेक्सने ५४६.४१ अंशांच्या कमाईसह, ५४,३६९.७७ ही पातळी गाठली. दिवसाच्या व्यवहारात मुंबई बाजाराच्या या निर्देशांकाने ५४,४६५.९१ हा अभूतपूर्व उच्चांकही दाखविला होता. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने १२८.०५ अंशांच्या वाढीसह, १६,२४६.८५ या पातळीवर दिवसातील व्यवहारांना निरोप दिला. १६,२९०.२० हा निफ्टीचा बुधवारच्या व्यवहारातील उच्चांक स्तर होता.

सेन्सेक्सच्या मुसंडीमध्ये एचडीएफसी लिमिटेडचा (४.७७ टक्के) सर्वात मोठा वाटा राहिला. खालोखाल कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक असा बँकांच्या समभागांचाच बोलबाला राहिला. दुसरीकडे, टायटन, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सीमेंट, सन फार्मा, मारुती आणि भारती एअरटेल हे आघाडीचे समभाग घसरणीला होते.

खरेदीचे ध्रुवीकरण..

गुंतवणूकदारांचा खरेदीचा उत्साह हा निवडक समभागांवरच केंद्रित होता. परिणामी सेन्सेक्समधील ३० पैकी १६ समभाग घसरणीला, तर १४ समभागांचे मूल्य वाढताना दिसले. खरेदीच्या धुव्रीकरणाचा फटका मिड व स्मॉल कॅप समभागांना बसला. मंगळवारप्रमाणेच मागणीच्या अभावी या समभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निर्देशांकांमध्ये एक टक्क्य़ाहून अधिक घसरण दिसून आली.