चार वर्षांतील भीषण साप्ताहिक आपटी
जागतिक बाजारातील घसरणीला साथ देतानाच सप्ताहअखेरच्या व्यवहारात नफेखोरी करून घेण्याच्या गुंतवणूकदारांच्या धोरणाने शुक्रवारी भांडवली बाजार त्याच्या गेल्या १४ महिन्यांच्या तळात आला. सेन्सेक्ससह निफ्टीतही एकाच व्यवहारात मोठी आपटी नोंदविली गेल्याने प्रमुख निर्देशांकाची ही तब्बल चार वर्षांनंतरची सर्वात मोठी सप्ताह घसरण ठरली.
महिन्यातील पहिल्या सप्ताहाची अखेर करताना ५६२.८८ अंश घसरणीसह सेन्सेक्स २५,२०१.९० पर्यंत खाली आला. तर १६७.९५ अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,७०० खाली येताना ७,६५५.०५ पर्यंत घसरला. प्रमुख निर्देशांकांची ही सलग चौथी साप्ताहिक घसरण आहे. महिन्यातील पहिल्या आठवडय़ात सेन्सेक्सने १,१९० तर निफ्टीने ३४६.९० अंशचे नुकसान सोसले आहे.
सलग तीन व्यवहारानंतर भांडवली बाजारांनी गुरुवारी प्रथमच तेजी नोंदविली होती. एकूण ९३० अंश घसरणीनंतर गुरुवारी सेन्सेक्स ३११ अंशांनी उंचावला होता, तर निफ्टीने ७,८०० पुढील टप्पा पार केला होता. बुधवारअखेरच्या घसरणीमुळे मुंबई निर्देशांक ८ ऑगस्ट २०१४ च्या तळात येऊन ठेपला होता.
२ टक्क्य़ांहून अधिकच्या घसरणीमुळे सेन्सेक्सने गेल्या १४ महिन्यातील तळ नोंदविला. यापूर्वी १४ जुलै २०१४ रोजी मुंबई निर्देशांक २५,००६.९८ वर होता, तर गेल्या तीन आठवडय़ात मुंबई निर्देशांक ३,००० अंशांनी खाली आला आहे. शुक्रवारी स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे २.४७ व १.९० टक्के घसरण नोंदली गेली.
सेन्सेक्समधील भारती एअरटेल व कोल इंडियावगळता इतर सर्व २८ समभाग घसरले. त्यातही वेदांता, गेल, टाटा स्टील, हिंदाल्को हे आघाडीवर राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता घसरणीत आघाडीवर राहिला. पाठोपाठ पायाभूत सेवा, ऊर्जा निर्देशांकांमध्ये घसरण नोंदली गेली.
व्यवहारातील रुपयाच्या अधिक तळात जाण्याची हालचालही भांडवली बाजारात नोंदली गेली.

गुंतवणूकदारांची मत्ता १.९२ कोटींनी रोडावली

शुक्रवारच्या एकाच व्यवहारातील तब्बल ५६३ अंश आपटीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता १.९२ कोटी रुपयांनी कमी झाली. बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य दिवसअखेर ९३,८३,६४३ कोटी रुपये नोंदले गेले. एकाच दिवसात त्यात १,९२,६०४.३६ कोटी रुपयांनी ऱ्हास झाला.

तज्ज्ञ काय म्हणतात..!
निफ्टी निर्देशांकाचा तळच्या दिशेने पुढील प्रवास ७,४०० ते ७,२०० असा राहण्याची शक्यता तर वर गेलाच तर तो ७,९२० पातळीवर अडखळण्याची शक्यता ‘कॅपिटल व्हाया ग्लोबल रिसर्च’चे विवेक गुप्ता यांनी वर्तविली आहे.
* बाजारातील सध्याची पडझड हीच उमद्या समभागांमध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे मत ‘जिओजित बीएनपी पारिबा फायनान्शिअल सव्र्हिसेस’चे मुख्य मूलभूत संशोधक विनोद नायर यांनी व्यक्त केली.
* वदेशी गुंतवणुकीचा भांडवली बाजारातील निधी काढून घेण्याचा ओघ सप्ताहअखेरही कायम राहिल, असे निरीक्षण हेम सिक्युरिटीजचे संचालक गौरव जैन यांनी नोंदविले आहे.