नफारूपी विक्रीला जोर

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने मंगळवारच्या व्यवहारात ५३,००० या शिखरालाही गाठले, पण याच स्तरावर नफा कमावण्यासाठी विक्रीला जोर चढला आणि तेजीची ही अभूतपूर्व कळसपातळी अल्पजीवी ठरली. परिणामी दिवसाचे व्यवहार आटोपत असताना, निर्देशांकाला अवघ्या १४ अंशांच्या वाढीवर समाधान मानावे लागले.

जगभरात अन्य प्रमुख बाजारांतील सकारात्मक संकेतांमुळे तसेच देशांतर्गत सोमवारी एका दिवसात झालेल्या विक्रमी लसीकरणाच्या पाश्र्वभूमीवर, सेन्सेक्सने जवळपास ५०० अंशांच्या दमदार मुसंडीसह मंगळवारच्या व्यवहाराला सुरुवात केली. यातून ५३,०५७.७१ या आजवरच्या सार्वकालिक उच्चांक स्तरालाही त्यानी सत्रारंभीच्या व्यवहारातच गाठले. मात्र विक्रमी स्तरावरील समभागांचे भाव हे नफा पदरी पाडून घेण्यासाठी आकर्षक ठरल्याने गुंतवणूकदारांकडून विक्रीला जोर चढला आणि त्यामुळे निर्देशांकाला उतरती कळा लागली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत निरंतर कमजोर होत असलेल्या रुपयाच्या मूल्याने बाजारातील नकारात्मक कलाला बळ मिळवून दिले. परिणामी सेन्सेक्सने १४.२५ अंशांची भर घालून ५२,५८८.७१ या पातळीवर दिवसाला निरोप दिला. त्याचबरोबर निफ्टी निर्देशांकही २६.२५ अंशांच्या कमाईसह दिवसअखेर १५,७७२.७५ या पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांत सलग तिसऱ्या सत्रात वाढ झाली आहे.

अमेरिकी डॉलरची सशक्तता गुंतवणूकदारांपुढील चिंतेचा विषय बनला आहे. रुपयाचे मूल्य मंगळवारी डॉलरपुढे आणखी २७ पैशांनी नरमले आणि ते ७४.३७ या पातळीवर घरंगळले. रुपयाचे मूल्य घसरत असतानाच, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीतही निरंतर सुरू असलेला भडका हे आधीच करोनाच्या दुसऱ्या लाटेने बेजार अर्थव्यवस्थेपुढे नव्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे.

जेट एअरवेजची झेप

दोन वर्षांनंतर पुनरूज्जीवनाची शक्यता निर्माण झाल्याने जेट एअरवेजच्या समभागाने मंगळवारी पाच टक्के झेप घेऊन, ९९.४५ रुपयांचा स्तर गाठला. मागील दोन वर्षांत कंपनीचे बाजार मूल्यांकन निम्म्याहून अधिक रोडावले आहे. कंपनीने उड्डाणे स्थगित करीत असल्याचे घोषणेच्या एक दिवस आधी (१६ एप्रिल २०१९ रोजी) समभागाचे मूल्य २४१.४५ रुपये असे होते.